Who is Justice Yashwant Varma: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा सध्या चर्चेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांना पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. होळीच्या दिवशी वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा वर्मा यांचे कुटुंबिय घरी नव्हते. आग विझवत असताना एका खोलीत बेहिशेबी रोकड आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सदर प्रकरण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना समजल्यानंतर कारवाईच बडगा उगारण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे?
१४ मार्च रोजी न्या. वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात अचानक आग लागली. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी एका खोलीत खूप मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आग लागली त्यावेळी न्या. वर्मा घरात उपस्थित नव्हते.
ही माहिती सर्वोच्च न्यायालय आणि सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. तसेच त्यांना पुन्हा अलाहाबाद न्यायालयात पाठविण्यात आले आहे.
न्या. यशवंत वर्मा कोण आहेत?
न्या. वर्मा यांचा जन्म ६ जानेवारी १९६९ रोजी अलाहाबाद येथे झाला. दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून त्यांनी बी. कॉमची पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशच्या रेवा विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले. ८ ऑगस्ट १९९२ रोजी त्यांनी वकिली सुरू केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर २०१४ रोजी न्या. वर्मा यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांच्या न्यायमूर्तीच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. १ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांची कायमची नियुक्ती झाली. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली होती.