Kai Trump Grand Daughter Of Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबीयांवर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. तीन विहाह केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना पाच मुले आणि १० नातवंडे आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्यांदा स्टेजवर आल्यापासून त्यांची मोठी नात काई ट्रम्प सोशल मीडियावरील उत्सुकतेचा विषय बनली आहे.
कोण आहे काई ट्रम्प?
१२ मे २००७ रोजी जन्मलेली काई ही डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि व्हेनेसा ट्रम्प (पूर्वी व्हेनेसा के पेर्गोलिझी) यांची मुलगी आहे. तिच्या पालकांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला आहे. ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दहा नातवंडांपैकी सर्वात मोठी आहे.
काई ट्रम्प सध्या १७ वर्षांची असून, ती नॉर्थ पाम बीच येथील द बेंजामिन स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. ती २०२६ मध्ये पदवीधर होईल आणि नंतर मियामी विद्यापीठात कॉलेजिएट गोल्फमध्ये कारकिर्द करणार आहे. याबाबत अमेरिकन वृत्तपत्र युएसए टुडेने वृत्त दिले आहे.
तिचे वडील, ट्रम्प ज्युनियर हे ४७ वर्षांचे असून, ते अमेरिकन उद्योगपती आहेत. याचबरोबरे ते ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्षही आहेत. काईचा जन्म आणि लहाणपण न्यू यॉर्कमध्ये गेले असले तरी, ती आता तिच्या आईसोबत फ्लोरिडा येथील ज्युपिटरमध्ये राहते. तिच्या गोल्फ रिक्रूटिंग प्रोफाइलनुसार, ती सुमारे चार वर्षांपूर्वी, जेव्हा ती १३ वर्षांची होती, तेव्हा तिने दक्षिण फ्लोरिडाला स्थलांतर केले.
काईला चार भावंडे आहेत. यात डोनाल्ड जॉन ट्रम्प तिसरा (१५ वर्षे), ट्रिस्टन मिलोस ट्रम्प (१३ वर्षे), स्पेन्सर फ्रेडरिक ट्रम्प (१२ वर्षाे) आणि क्लो सोफिया ट्रम्प (१० वर्षे) यांचा समावेश आहे.
गोल्फर काई ट्रम्प
काई एक उत्तम गोल्फपटू आहे, ती सध्या ज्युपिटरमधील बेंजामिन स्कूलकडून खेळते. राजकीय पार्श्वभूमी आणि कुटुंबात सतत कोणत्या ना कोणत्या घटना घडत असूनही तिने आतापर्यंत तिच्या संघासाठी एकही गोल्फ सामना किंवा सराव चुकवला नाही. निवडणुकीच्या दिवशीही काई मियामीमध्ये प्रादेशिक संघांसाठी खेळत होती.
व्हॉगर काई
काईच्या “इलेक्शन नाईट व्हॉग”मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या दिवशी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या मुख्यालयात काय घडले याची पडद्यामागील झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हॉग सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, त्याला ४.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.