Who is Zikra, Delhi Lady Don: ईशान्य दिल्लीच्या सीलमपूर भागात १७ वर्षांचा कुणाल दूध आणायला घराबाहेर गेला असता चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याची निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या हत्येमुळे दोन धार्मिक गटात तणाव निर्माण झाला असून मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर हत्येचा संशय व्यक्त केला असून ते दोघेही फरार आहेत. तसेच या प्रकरणी जिकरा नावाच्या एका महिलेचेही नाव समोर आले असून हत्येचा कट तिनेच रचल्याचे बोलले जात आहे.
कोण आहे लेडी डॉन जिकरा?
जिकरा सोशल मीडियावर हत्यारांसह व्हिडीओ टाकत असल्यामुळे वादात आहे. तुरुंगात असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाची पत्नी झोयासाठी बाऊन्सर म्हणून जिकराने काम केलेले आहे. तसेच ती शोएब मस्तान गँगची सदस्य आहे. सीलमपूर भागात या गँगची दहशत असल्याचे सांगितले जाते. २२ वर्षांच्या जिकराला दोन वर्षांचा मुलगा असून ती पतीपासून विभक्त झालेली आहे.
जिकराच्या शेर की शेरणी या इन्स्टाग्राम हँडलवर १५ हजार फॉलोअर्स असून ती लेडी डॉन असल्याप्रमाणे व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे तुला कारावास भोगावा लागला होता. १० दिवसांपूर्वीच तिला जामीन मिळाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालच्या हत्येसाठी जिकराने कट रचला असा आरोप केला जात आहे. शोएब मस्तान गँगमधील दोन अल्पवयीन आरोपींना जिकराने हत्या करण्यासाठी उकसवल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.
जुन्या भांडणाचा सूड
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या परिसरात एक चाकू हल्ल्याची घटना घडली होती. यात एक आरोपी जखमी झाला होता. सदर हल्ल्यामागे कुणालचा हात असल्याचा संशय आरोपींना होता. गुरूवारी कुणालची हत्या याच जुन्या भांडणाच्या रागातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गुरूवारी कुणाल आपल्या आजीला रुग्णालयातून घेऊन घरी आला होता. त्यानंतर तो दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला असता एका अरूंद गल्लीत चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याला घेरून चाकूने भोसकले. यात कुणालचा मृत्यू झाला.