Owner Of First Tesla Car In India: भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचा सायबरट्रक मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. सुरतमधील करोडपतींपैकी एक असलेले लवजी दलिया उर्फ लवजी बादशाह यांच्याकडे टेस्लाच्या फाउंडेशन सिरीजची भारतातील पहिली सायबरट्रक कार असल्याचा दावा केला जात आहे. दलिया हे रिअल इस्टेट डेव्हलपर आणि गोपिन ग्रुपचे प्रवर्तक आहेत.

दलिया यांचा मोठा मुलगा पीयूष यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “आम्ही ऑनलाइन चौकशी केल्यानंतर, समजले की ही भारतातील टेस्लाची एकमेव कार आहे. भारतात आतापर्यंत अशी कोणतीही कार आयात केलेली नाही. आम्ही सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतील टेक्सास येथील टेस्ला शोरूममध्ये ही कार बुक केली होती. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर, आम्हाला काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी मिळाली, म्हणून आम्ही कार दुबईला आणली जिथे रोड रजिस्ट्रेशन झाले. त्यानंतर, टेस्लाची ही कार समुद्री मार्गाने भारतात आणली.”

एलोन मस्क यांच्या टेस्लाने बनवलेली ही कार गुरुवारी (२४ एप्रिल रोजी) सुरतमध्ये पोहोचली. टेस्लाच्या या सायबरट्रक कारची मूळ किंमत ७०,००० अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे ६० लाख रुपये इतके आहे.

या कारची किंमत किती होती हे न सांगता, पियुष म्हणाले “लॉजिस्टिक्स चार्जेस खूप जास्त होते. या कारमध्ये पाच लोक बसू शकतात. कार सुरतमध्ये उतरल्यानंतर, मी माझे आईवडील आणि धाकटा भाऊ यांना घेऊन गाडी चालवली. ही गाडी चालवणे हा एक अद्भुत अनुभव होता. आम्हाला आशा आहे की, टेस्ला कंपनी भारतात त्यांचे शोरूम लवकरच उघडेल. भारतातील कार प्रेमींमध्ये या टेस्लाला मोठी मागणी आहे.”

मूळ भावनगरचे असलेले ५५ वर्षीय लवजीभाई ‘बादशाह’ काही वर्षांपूर्वी हिरे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरतला स्थलांतरित झाले होते. ते म्हणाले, “सध्या, आम्ही सुरतमध्ये ही कार वापरत आहोत आणि आम्ही महामार्गांवर किंवा इतर जिल्ह्यांमध्ये कोणताही प्रवास केलेला नाही. शहरात, आम्ही जिथे जातो तिथे, सुमारे ५० ते १०० लोक कार पाहण्यासाठी गोळा होतात. लोकांना या कारबद्दल खूप उत्सुकता आहे. त्यांना कारच्या इंटेरिअर्स आणि इतर पैलूंबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. कारची संपूर्ण बॉडी स्टेनलेस स्टीलची बनलेली आहे, ज्यामध्ये वक्र आहेत आणि टायर अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की कार खडबडीत रस्त्यांवर देखील चांगल्या पद्धतीने धावू शकते.”