पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये निवडणूक रॅली काढली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी इतर भाजपा नेत्यांनीही भाषणं केली. आपल्या भाषणात तेलंगणमधल्या भाजपा नेत्यांनी मडिगा समाजावर होणारा अन्याय आणि त्यांचे हक्क कसे डावलले जात आहेत यावर भाष्य केलं. भाजपाचे वक्ते बोलत असताना मंदा कृष्णा मडिगा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी बसले होते. भाषण ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले. ज्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले. पंतप्रधान मोदींनीही त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना शांत केलं. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
नेमकं काय घडलं?
निवडणूक रॅली सुरु असताना मंदा कृष्णा मडिगा हे भावूक झाले. त्यांचं सांत्वन नरेंद्र मोदी यांनी केलं. यानंतर आता लोकांना चांद्रयान २ चं मिशन २०१९ मध्ये जेव्हा अपयशी ठरलं होतं तेव्हा इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन हे अक्षरशः धाय मोकलून रडले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं सांत्वन केलं होतं त्याच दृश्यांची आठवण झाली आहे.
कोण आहेत मंदा कृष्णा मडिगा?
मंदा कृष्णा मडिगा हे तेलंगणमधले दलित समाजाचे नेते आहेत. मडिगा रिजर्व्हेशन पोराटा समितीचे ते अध्यक्षही आहेत. आरक्षण पोराटा समितीची स्थापना काही वर्षांपूर्वीच झाली होती. तेव्हा हा जिल्हा आंध्र प्रदेशात येत होता, आता तो तेलंगणचा भाग आहे. तेलंगणमध्ये मडिगा समाज हा अनुसूचित जातींचा खूप मोठा घटक मानला जातो.
मंदा कृष्णा मडिगा यांचा समावेश राज्यातल्या महत्त्वाच्या दलित नेत्यांमध्ये होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये मंदा कृष्णा मडिगा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारची खुर्ची देण्यात आली होती. मडिगा २०१३ मध्ये मोदींना भेटले होते. भाजपाने २०१४ च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मडिगा समुदायाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. मात्र भाजपाला २०१४ मध्ये या विधानसभा निवडणुकीत यश आलं नाही. त्यामुळे हे आश्वासन पूर्ण झालं नाही. मडिगा समुदाय चामड्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे या समुदायाला वंचित समुदाय मानलं जातं. मडिगा समिती गेल्या अनेक वर्षांपासून एससी कॅटगरीतील आरक्षणात वेगळ्या कोट्याची मागणी करतो आहे.