काँग्रेसपाठोपाठ आज भाजपानेही राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाकडून अशोक चव्हाण, अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्या प्रवेशाला ४८ तास पूर्ण व्हायच्या आत त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेवर विनोद तावडे, पंकजा मुंडे, नारायण राणे यांना पाठवलं जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपाने जी यादी निश्चित केली आहे त्यात अजित गोपछडे, अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी या तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मेधा कुलकर्णींच्या नावाची चर्चा
राज्यसभेसाठी भाजपा कुणाला उमेदवारी देणार? याच्या विविध चर्चा होत असतानाच मेधा कुलकर्णी यांचं नाव समोर आलं होतं. मेधा कुलकर्णी या भाजपाच्या कोथरुडच्या माजी आमदार आहेत. मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेकडे थकबाकीबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र तातडीनं मागितलं होतं. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी या भाजपाच्या कोथरुड मतदारसंघातील माजी आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा ६४ हजार मतांनी पराभव केला होता.
२०१९ मध्ये मेधा कुलकर्णी यांचं तिकिट कापून ते चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं होतं.
याआधी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही.
मेधा कुलकर्णी यांना जेव्हा डावलण्यात आलं त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर असे ‘निष्ठावंतांचे डावललेले जिणे’ या मथळ्याखाली पोस्ट लिहिली होती आणि नाराजी व्यक्त केली होती.
कोथरुडचे विद्यमान नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्व मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा सवाल त्यांनी केला होता.
आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात त्यांची ही पोस्ट होती. त्यामुळे त्या आता वेगळा विचार करतील अशाही चर्चा रंगल्या होत्या.
मेधा कुलकर्णी यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली नाही. मेधा कुलकर्णी या देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
हे पण वाचा- मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे; पंकजा मुंडे यांचे नाव नाही
मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन
मेधा कुलकर्णी यांनी थेट ही भूमिका चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घेतल्यामुळे आता त्यांचं राजकीय पुनर्वसन नेमकं कसं केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. मागच्या पाच वर्षांपासून अनेकदा त्यांचं नाव हे विविध पदांसाठीही चर्चेत राहिलं. मात्र त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आता २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना आणि राज्यसभेची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार असताना भाजपाने त्यांचं नाव जाहीर केलं आहे. मेधा कुलकर्णी यांच्यासाठी हे राजकीय पुनर्वसनच आहे. कारण विकासकामांमध्ये उत्तम सहभाग घेऊन, कोथरुड भागात पक्ष मोठा करुनही त्यांना २०१९ मध्ये तिकिट देण्यात आलं नव्हतं. मात्र आज राज्यसभेच्या उमेदवरांची यादी जाहीर करताना मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची संधी भाजपाने सोडली नाही यात काही शंकाच नाही.