Bangladesh Protest Updates: आरक्षणाच्या प्रश्नावर बांगलादेशमध्ये महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन सुरू होते. आंदोलन पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले आणि शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. विद्यार्थ्यांमुळे देशभरात आंदोलन पेटले आणि या आंदोलनाचा नेता आहे ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाहिद इस्लाम. नाहिदने बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की, पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडावे लागले.
नाहिद इस्लाम ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिसक्रिमिनेशन’ या संघटनेचा समन्वयक आहे. पुढच्या २४ तासांत बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करू, असे आवाहन नाहिद इस्लामने केले आहे. नाहिदने दावा केला होता की, त्याला २० जुलै रोजी अटक करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पोलिस नाहिदला गाडीत टाकत असल्याचे दिसत होते. नाहिद बेशूद्ध अवस्थेत होता. त्यानंतर २४ तासांनी तो बेपत्ता झाला. नाहिदने सांगितले की, पोलिसांनी त्याला बेशूद्ध होईपर्यंत मारहाण केली.
हे वाचा >> बांगलादेशप्रकरणी भारताची सर्वपक्षीय बैठक सुरू; सुप्रिया सुळे, राहुल गांधींसह अनेक नेते उपस्थित!
तत्पूर्वी १९ जुलै रोजी नाहिदचे मित्र आसिफ मोहम्मद आणि अबू बकर यांना अटक करण्यात आली होती. सहा दिवसांनी त्या दोघांनाही अज्ञात स्थळी सोडण्यात आले. २६ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते जखमी असल्याचे समोर आले. पोलिसांनी दावा केला की, त्या दोघांचा जीव वाचविण्यासाठीच त्यांना ताब्यात घेतले होते. याचदरम्यान आंदोलन शमविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडून व्हिडीओही तयार करून घेतले.
दरम्यान नाहिद इस्लाम पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्याने विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र केले. ज्यामुळे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यांवर उतरले.
२४ तासांत बनणार अंतरिम सरकार
नाहिद इस्लामने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्याने दावा केला की, पुढील २४ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. त्याने सांगितले की, आम्ही समन्वय समिती, नागरी संस्था आणि राजकीय तसेच इतर संबंधित लोकांची चर्चा करू. २४ तासांत अंतरिम सरकारची रुपरेषा ठरविली जाईल. तसेच जर लष्कराने आणीबाणी लादून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते स्वीकारणार नाही, असा इशाराही नाहिद इस्लामने दिला आहे.