Who is Nidhi Tiwari: २०१४ च्या बॅचच्या सनदी अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयामार्फत यासंदर्भात तशा सूचना आल्यानंतर कार्मिक विभागाकडून (Department of Personnel & Training) तसा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. २९ मार्च २०२५ रोजी हे आदेश काढले असून त्याच दिवसापासून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव म्हणून रुजू झाल्या आहेत.
कोण आहेत निधी तिवारी?
निधी तिवारी या वरीष्ठ सनदी अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवा अर्थात Indian Foreign Services मध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ नोकरी केल्यानंतर आता त्यांच्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. निधी तिवारी यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
पंतप्रधान कार्यालयात रुजू होण्याआधी निधी तिवारी या परराष्ट्र विभागाच्या डिसआर्ममेंट अँड इंटरनॅशनल सेक्युरिटी अफेअर्स शाखेच्या अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहात होत्या.
निधी तिवारींची नियुक्ती का महत्त्वाची?
निधी तिवारी यांनी परराष्ट्र विभागात काम करताना त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या प्रत्येक घटनेच्या बाबतीत भारताला आपली नेमकी भूमिका जागतिक पटलावर प्रभावीपणे मांडणं आवश्यक ठरलं आहे.
/PM Modi on RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संघ मुख्यालयाशी इतकी वर्ष ‘का रे दुरावा’?
यापार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास असणाऱ्या व परराष्ट्र विभागात प्रभावी कामगिरी केलेल्या निधी तिवारी यांची नियुक्ती भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी मोलाचं सहकार्य ठरू शकते.