Atul Subhash Wife Nikita Singhania : बंगळुरूतील अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अतुल सुभाष यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर पुरुषांच्या अधिकाराबाबत आता देशभरात चर्चा होत असून, पीडिताला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

अतुल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नी निकिता, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्यावर छळ केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

अतुल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात आरोप केला की, पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात अनेक खोट्या पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये घरगुती हिंसाचार, हुंडा मागणी आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या तक्रारींचा समावेश आहे. याचबरोबर न्यायालयातील सुनावणी वेळी पत्नी निकिता जीव दे असेही म्हणाल्याचे अतुल यांनी पत्रात लिहिले आहे. दरम्यान याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

कोण आहे निकिता सिंघानिया?

अतुल आणि निकिता यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांची २०१९ मध्ये एका विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी २०२१ मध्ये त्यांनी विवाह केला. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यामध्ये सर्वकाही सुरळीत होते. पण, काही दिवसांनी परिस्थिती बिघडली. दरम्यान अतुल यांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्यांची पत्नी निकिताची आता देशभरात चर्चा होत आहे. अतुल यांनी पत्नीवर पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले आहेत. याबाबत जनसत्ताने पीटीआयच्या माहितीवरून वृत्त दिले आहे.

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. ती दिल्लीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तिच्या माहेरची लोक उत्तर प्रदेशातील जौनपूरचे आहेत.

हे ही वाचा : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे

देशभरात संतापाची लाट

अतुल सुभाष यांच्याबरोबर जो प्रकार घडला त्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. याबाबत सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. समाज माध्यमांवर अनेक लोक #JusticeForAtuSubhas आणि #MenToo असा हॅशटॅग चालवत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांनी महिलांसाठी केलेल्या कायद्याचा कसा दुरूपयोग केला जातो याबाबात सांगत आहेत. दरम्यान अतुल सुभाष यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी निकिता, सासू निशा, मेहुणा आणि पत्नीचा चुलता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader