देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपा नेतृत्वाखालील एनडीएकडून २०२४ मध्येही पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी दिली. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असंही गेहलोत म्हणाले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना गेहलोत यांनी ही माहिती दिली.
‘इंडिया’ आघाडीवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची युती झाली आहे, असंही ते म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहंकारात राहू नये. २०१४ मध्ये भाजपाला केवळ ३१ टक्के मते मिळाली होती. उर्वरित ६९ टक्के मतं त्यांच्या विरोधात होती. गेल्या महिन्यात जेव्हा ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांची बंगळुरू येथे बैठक झाली, तेव्हा ‘एनडीए’ घाबरली आहे,” असंही गेहलोत यांनी नमूद केलं.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए ५० टक्के मतांसह सत्तेत येईल, या दाव्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे कधीही साध्य करू शकणार नाहीत. ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांना असं करता आलं असतं. पण आता त्यांना ५० टक्के मतं मिळू शकत नाहीत. याउलट त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. त्यामुळे २०२४ मध्ये पंतप्रधान कोण बनेल? हे आगामी लोकसभा निवडणुकांचे निकालच ठरवतील.”