Actor Ranya Rao Gold Smuggling Charges : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली. तिच्याकडून १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. या अभिनेत्रीबाबत विविध प्रकारची माहिती समोर येते आहेत. त्यातच एक माहिती अशीही कळली आहे की तिचे वडील रामचंद्र राव हे पोलीस अधिकारी आहेत. आपण या बातमीतून जाणून घेऊन रान्या रावचे वडील रामचंद्र राव कोण आहेत?
नेमकं काय प्रकरण घडलं?
रान्या रावने मागच्या वर्षभरात गल्फ देशांमधल्या १० तरी फेऱ्या केल्या आहेत. तसंच मागच्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. रान्या राववर पोलिसांना संशय आलाच होता. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. तिच्या झडतीत पोलिसांना सगळं घबाड सापडलं. असंही सांगितलं जातं आहे की एका पोलीसाच्या मदतीने तिने हे सगळं घडवलं. कारण तो पोलीस कॉन्स्टेबल तिला विमानतळातून बाहेर पडण्यासाठी मदत करायचा. एवढंच नाही तर जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो प्रतिथयश आर्किटेक्ट आहे. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार रान्याने तिच्या कपड्यांच्या आतून मांड्या, कंबर या ठिकाणी सोनं लपवलं होतं. एक माहिती अशीही समोर येते आहे की तिने दुबईच्या साधारण ३० फेऱ्या केल्या आहेत. यावेळी मात्र ती पकडली गेली. ज्यानंतर तिच्याकडे १२ कोटी सोनं आढळून आलं आहे. जे ज्पत करण्यात आलं आहे आणि तिला अटक करण्यात आली.
रान्या रावचे वडील रामचंद्र राव कोण आहेत?
रामचंद्र राव हे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आज घडीला ते पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे डीजीपी अर्थात पोलीस महासंचालक आहेत. त्यांनी याआधी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर उच्चपदांवरही काम केलं आहे. कर्नाटक राज्य पोलीस निवास आणि विकास निगम लिमिटेडचे प्रबंध संचालक म्हणूनही त्यांनी पद भुषवलं आहे. मात्र रान्या रावच्या या सोने तस्करीशी आपला काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही रामचंद्र राव हे नाव याआधी वादांमध्ये अडकलं आहे.
IPS रामचंद्र राव यांच्याबाबत कुठले वाद झाले?
मैसूर येथील बस लुटीच्या घटनेत त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. एका बंदुकधारी माणसाने काही पोलिसांनी बसची लूट करुन सव्वा दोन कोटी रुपये चोरले होते. या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली. ज्यानंतर बंदुकधारी माणसाला अटक झाली आणि राव यांची बदली करण्यात आली होती. अशा इतरही छोट्या वादांमध्ये त्यांचं नाव समोर आलं होतं. रान्या रावने १५ दिवसांत दुबईच्या चार फेऱ्या केल्या. त्याआधीही ती गल्फ देशांमध्ये अनेकदा जाऊन आली आहे. त्यामुळे ती तस्करी करत असावी असा संशय पोलिसांना होताच जो खरा ठरला. त्यावेळी मी डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी आहे असं सांगत तिने सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.
रामचंद्र राव यांनी रान्याच्या सोने तस्करीबाबत काय म्हटलं आहे?
रामचंद्र राव म्हणाले, “रान्या रावने जे काही केलं ते काही मला माहीत नाही. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह जतीन हु्क्केरी या प्रसिद्ध आर्किटेक्टशी केला आहे. रान्याचा पती आणि त्याचे इतर व्यवसाय याबाबत मला काही माहीत नाही. तसंच तिने केलेल्या सोन्याच्या तस्करीशी माझा काही संबंध नाही. जे काही घडलं ते लाज आणणारं आहे. तिच्याकडून गु्न्हा घडला आहे त्यामुळे आता कायदेशीर मार्गाने होणार आहे ते होईल” अशी प्रतिक्रिया रामचंद्र राव यांनी दिली आहे.
३३ वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदुस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील के रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कर्नाटक राज्य पोलिस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगळुरूमधून पूर्ण केलं. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. २०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली