Who Is Rekha Gupta: दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्यानंतर, त्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाने ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनकर यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर आमदारांच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित करण्यात आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपवला आहे. ७० जागांच्या विधानसभेत भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने २२ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्लीत खाते उघडता आले नाही.
रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला आहे.
आरएसएस, एबीव्हीपी कनेक्शन
रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदद्वारे विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला होता. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडून आल्या होत्या. १९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या. पुढे त्यांनी १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपदही मिळवले होते.
विधानसभेत दोन वेळा पराभव
२०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. २०१५ मध्ये त्यांचा सुमारे ११००० मतांनी पराभव झाला होता तर २०२० मध्ये त्यांचा पराभवाचे अंतर ३४४० मते इतके होते. दोन्ही वेळी त्यांच्यावर वंदना कुमारी यांनी विजय मिळवला होता. पण यावेळी रेखा गुप्ता यांनी निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
पती आणि मुले
रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंद येथील आहेत. त्यांच्या वडिलांना दिल्लीत नोकरी मिळाल्यानंतर त्या कुटुंबासह दिल्लीला स्थलांतरित झाल्या होत्या. रेखा गुप्ता यांचे शालेय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांचे लग्न १९९८ मध्ये मनीष गुप्ता यांच्याशी झाले होते. ते स्पेअर पार्ट्सचे व्यापारी असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.