लोकसभा २०२४ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही पक्षांकडून जागावाटप, निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जनसत्ताने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाच्या नेतृत्त्वाखाली एनडीए ही देशातील सर्वांत मोठी युती उदयास आली. यामुळे एनडीए खासदारांची संख्या ३२९ झाली. तर, एनडीएविरोधात आता इंडिया आघाडी उभी ठाकली आहे. सध्या इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीतील सर्वांत मोठा घटक पक्ष काँग्रेसने डोनेट फॉर देश ही ऑनलाईन क्राऊड फडिंग मोहीम सुरू केली आहे.
२०१९ मध्ये भाजपा जागावाटपात इतर पक्षांच्याही पुढे होता. निधीच्याही बाबतीत भाजपा पुढे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, दोन्ही आघाड्यांकडे प्रभावी प्रचारासाठी पुरेसा निधी असणे महत्त्वाचे आहे. मात्र, आर्थिक आघाडीवर भाजपाशी मुकाबला करणे इंडिया आघाडीसाठी फार कठीण ठरण्याची शक्यता आहे.
कोणाकडे सर्वाधिक निधी?
ADRने जाहीर केलेल्या २०१८-१९ आणि २०२१-२२ मधील आकडेवारीनुसर भाजपा इतर पक्षांच्या तुलनेत श्रीमंत आहे. इंडिया आघाडीच्या २६ घटक पक्षांपैकी १६ पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आपली संपत्ती जाहीर केली आहे. तर एनडीएतील ३४ घटकपक्षांपैकी १६ पक्षांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. एडीआरने सादर केलेला अहवाल हा इंडिया आघाडीची स्थापना होण्याआधाचा आहे. त्यामुळे आघाडीच्या निधीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निधी समाविष्ट नाही. त्यावेळी युपीए आघाडी अस्तित्त्वात होती.
२०१८-१९ ते २०२१-२२ पर्यंत विविध पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ वगळता प्रत्येक वेळी वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत युपीए एनडीएपेक्षा मागे पडली. २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांमध्ये युपीए एनडीएच्या जवळपासही नव्हती. २०२१-२२ मध्ये कमाईच्या बाबतीत एनडीएकडे युपीएपेक्षा १५६ कोटी जास्त होते.
२०१८-१९ मध्ये युपीए आघाडीत काँग्रेसचा ७० टक्के वाटा आहे. २०२१-२२ मध्ये निवडणूक आयोगात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, हा आकडा ३० टक्क्यांनी कमी होऊन ५४१.३ कोटी रुपयांवर आला. २०२१-२२ मधील उत्पन्नाच्या बाबतीत, टीएमसी (५४५.७ कोटी), डीएमके ३१८.७ कोटी, सीपीआय (एम) १६२.२ कोटी, जेडीयू ८६.६ कोटी, समाजवादी पक्ष ८६.६ कोटी हे मोठे पक्ष आहेत. तर, आम आदमी पक्षाकडे ४४.५ कोटींचा निधी आहे.
मालमत्ता कोणाकडे अधिक?
मालमत्तेतही एनडीएकडे सर्वाधिक मालमत्ता आहे. २०१८-१९ आणि २०२१-२२ मध्ये एनडीएने आपली मालमत्ता दुप्पट वाढवली. तर, तुलनेने युपीएची मालमत्ता फक्त २८ टक्क्यांनी वाढली.
नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीतील काँग्रेसकडे सर्वाधिक संपत्ती आहे. २०१८-१९ मध्ये काँग्रेसकडे ९२८.८ कोटी मालमत्ता होती. २०२१-२२ मध्ये ही मालमत्ता २५ टक्क्यांनी कमी होऊन८०५.७ कोटींपर्यंत आली. तर, सीपीआय (एम) ७३५.८ कोटी, समाजवादी पार्टी ५६८.४ टक्के, टीएमसी ४५८.१ कोटी, डीएमके ३९९.१ कोटी, जेडीयु १६८.९ कोटी मालमत्ता आहे.