Richest CM of India: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) जाहीर केलेल्या नव्या अहवालातून भारतातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? आणि गरीब मुख्यमंत्री कोण? याची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ५२.५९ कोटी एवढी आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न हे जवळपास १ लाख ८५ हजार ८५४ इतके आहे. तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १३ लाख ६४ हजार ३१० एवढे आहे. देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची संपत्ती एकूण १,६३० कोटी इतकी आहे.
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटींची संपत्ती आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे दुसऱ्या क्रमाकांवर असून त्यांची संपत्ती ३३२ कोटी एवढी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांची संपत्ती ५१ कोटी इतकी आहे.
कर्जाच्या बाबतीत पेमा खांडू यांच्यावर सर्वाधिक म्हणजे १८० कोटींचे कर्ज आहे. तर सिद्धरामय्या यांच्यावर २३ कोटी तर नायडू यांच्यावर १० कोटींचे कर्ज आहे.
सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?
याउलट सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा क्रमांक वर लागतो. त्यांच्याकडे केवळ १५ लाखांची संपत्ती आहे. तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ५५ लाखांची संपत्ती जाहीर केलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती?
एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर त्यांच्यावर ६२ लाखांचे कर्ज आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांकडेही एक कोटींची संपत्ती असून त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.