Lebanon Pager Blasts Indian man Connection: लेबनानमध्ये पेजरचा स्फोट होऊन हेझबोलाचे हजारो सदस्य जखमी झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. लेबनानने या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे सांगितले. ज्या कंपनीने पेजरचा पुरवठा केला, यालाही यामध्ये जबाबदार धरले गेले आहे. मात्र इस्रायलने अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारचा इलेक्ट्रॉनिक हल्ला झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आता या प्रकरणात एका भारतीय नागरिकाचे नाव चर्चेत आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय माध्यमात आलेल्या बातमीनुसार, केरळच्या वायनाड येथे जन्मलेला आणि सध्या नॉर्वेत राहणार्‍या रिन्सन जोसचा पेजर पुरवठा करण्यात हात असल्याची चर्चा आहे. त्याच्या माध्यमातूनच हेझबोलाच्या अतिरेक्यांना पेजरचा पुरवठा झाला होता. गोल्ड अपोलो या कंपनीने तयार केलेल्या पेजरमध्ये इस्रायलच्या मोसाद या संघटनेने तीन ग्रॅम स्फोटके बसविली होती, असा आरोप आता होत आहे. गोल्ड अपोलो या कंपनीने स्फोटानंतर निवेदन देताना म्हटले की, पेजरच्या ज्या मॉडेलचा स्फोट झाला, ते हंगेरीमधील बुडापेस्ट स्थित असलेल्या बीएसी कन्सलंन्टीग केएफटी या कंपनीने बनविलेले होते. आमचा फक्त ट्रेडमार्क त्यासाठी वापरला होता.

हे वाचा >> विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?

रिन्सन जोसचे नाव कसे पुढे आले?

आयएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, जोस उच्चशिक्षणासाठी नॉर्वेमध्ये गेला होता. नॉर्वेत जाण्याआधी त्याने लंडन येथे काही काळ नोकरी केली होती. नॉर्वेतील डीएन मीडिया या कंपनीसाठी त्याने पाच वर्ष नोकरी करत असल्याचे त्याच्या लिंकडिन प्रोफाइलवरून समजते. जोस हा त्याच्या पत्नीसह ओस्लो येथे स्थायिक झालेला आहे. तर त्याचा जुळा भाऊ लंडन येथे काम करतो.

जोसच्या नातेवाईकांनी सांगितले की, आमचे जोसशी दररोज फोनवरून बोलणे व्हायचे. मात्र पेजर स्फोटाची बातमी आल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून आमचे काहीच बोलणे झालेले नाही. त्याचा कोणत्याही चुकीच्या कामात काहीही संबंध नसेल, अशी आमची खात्री आहे. आम्हाला वाटते, त्याला या प्रकरणात फसवले गेले असावे.

जोसने २२ एप्रिल रोजी नोर्टा ग्लोबल लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी बल्गेरियाच्या सोफिया येथे स्थित आहे. मागच्या वर्षी युरोपियन संघाच्या बाहेर कन्सल्टिंग सेवा देऊन या कंपनीने एका वर्षात सहा कोटींचा नफा कमविला होता. याच कंपनीची आता बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून चौकशी होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेकडो पेजर्स हेझबोलाला विकण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा >> मोबाईल सहज उपलब्ध असताना हेझबोलानं पेजरच का निवडले? लेबेनॉनमधील स्फोटांनंतर चर्चा!

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, नोर्टा कंपनीच्या बल्गेरियातील मुख्यालयाच्या पत्त्यावर २०० कंपन्यांची नोंदणी केलेली आहे. मात्र त्याठिकाणी नोर्टा कंपनीचा मात्र कोणताही नामोल्लेख दिसत नाही. रॉयटर्सने जोसशी संपर्क साधून पेजर्सच्या व्यवहाराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देता रॉयटर्सच्या प्रतिनिधीचा फोन कट केला, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is rinson jose keral born businessman linked to hezbollah pager blasts in lebanon kvg
Show comments