रेल भवनाजवळ धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ठाम आहेत. दिल्लीचा मुख्यमंत्री मी आहे. मी पाहिजे तिथे धरणे धरण्यास बसेन, आंदोलनाचे ठिकाण ठरविणारे सुशीलकुमार शिंदे कोण आहेत, असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.
दिल्ली पोलीसांच्या तीन अधिकाऱयांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी केजरीवाल सोमवारी सकाळी नॉर्थ ब्लॉकसमोर धरणे आंदोलन करण्यास निघाले असताना त्यांना रेल भवनाजवळ पोलीसांनी अडविले. त्यामुळे तिथेच त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. पोलीसांनी त्यांना आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास सांगितले. मात्र, केजरीवाल यांनी त्यास नकार दिला. आंदोलनाचे ठिकाण ठरविण्यावरून केजरीवाल यांनी शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. ते म्हणाले, आम्ही आमचे धरणे आंदोलन इथेच सुरू ठेवणार आहोत. इथे आंदोलन करून नका, असे सांगणारे शिंदे कोण? दिल्लीमध्ये गुन्हेगारी भयानक वाढली असताना, शिंदे शांतपणे झोपू कसे काय शकतात. असा सवाल केजरीवाल यांनी विचारला. दिल्लीतील महिलांची सुरक्षितता धोक्यात असताना आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
केजरीवाल यांच्या आंदोलनामध्ये रेल भवनाजवळील केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, रेसकोर्स आणि पटेल चौक ही मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत. आंदोलनामुळे कोणतीही मेट्रो स्थानके बंद ठेवू नका, अशीही मागणी केजरीवाल यांनी शिंदे यांच्याकडे केलीये. पोलीसांनी या संपूर्ण परिसराची नाकेबंदी केल्यामुळे त्याचे रुपांतर कारागृहात झाल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Story img Loader