इस्रायलच्या हल्ल्यात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध अद्याप थांबलेलं नाही या संघर्षात वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. राफा प्रदेशातून युनूस भागात हॉस्पिटलच्या वाहनातून प्रवास करताना त्यांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी सोमवारी रात्री दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. आपण त्यांच्याबाबत जाणून घेऊ.
कोण होते वैभव काळे?
वैभव अनिल काळे हे निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी होते. भारतीय लष्करात ते कर्नल पदावर कार्यरत होते आणि याच पदावरुन निवृत्त झाले होते. भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचीन, ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणूनही ते कांगोमध्ये कार्यरत होते. ईशान्य भारतात त्यांनी सेवा बजावली होती. पठाणकोट लष्करी तळावरच्या हल्ल्यावेळीही त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.
मूळचे नागपूरचे होते वैभव काळे
भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यानंतर यूएनमध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले. युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरीटीचे कर्मचारी होते. रुजू झाल्यानंतर ते गाझात सक्रिय झाले. तिथं नागरिकांना मदत करताना त्यांना वीरमरण आलं. वैभव काळे हे ४६ वर्षांचे होते. वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचं बालपण नागपुरात गेलं. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे.
हे पण वाचा- माजी लष्करी अधिकारी काळे यांचा गाझातील हल्ल्यात मृत्यू
भारतीय लष्करात २२ वर्षांची सेवा
पुण्यातील खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतून वैभव काळे यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या ११ व्या बटालियनमध्ये ते जून २०२० ते निवृत्तीपर्यंत कार्यरत होते. दहशतवाद विरोधी कारवायांचे ते तज्ज्ञ होते. त्यांनी भारतीय लष्करात २२ वर्षांची सेवा बजावली. या लष्करी सेवेत त्यांनी अनेक पदं भुषवली होती. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
भारतीय लष्करामधून २०२२ मध्ये वैभव काळेंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुण्यात वास्तव्यास असताना त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली. या कंपन्यांमध्ये ते सुरक्षेसंदर्भातील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर मानव सेवा करण्याच्या उद्देशाने वैभव काळेंनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पसंती दिली होती. लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी बदल घडवणारं काम करावं असं त्यांना फार वाटायचं. त्यामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.
वैभव काळेंचा मृत्यू कसा झाला?
वैभव काळे ज्या वाहनात युनोच्या कर्मचाऱ्यांसह प्रवास करत होते त्याच वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले.