Vibhor Sharma Youngest RSS Swayamsevak : उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्वात लहान आरएसएस स्वयंसेवकाला भेटण्याकरता सरसंघचालक मोहन भागवत स्वतः घरी गेले होते. त्याची दिनचर्या आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेलं आदरातिथ्य पाहून मोहन भागवत भारावून गेले आहेत. अवघ्या सहा वर्षांच्या विभोर शर्मा या मुलाने मोहन भागवत यांना प्रेरित केलं असून त्यांनी निघताना त्याचं तोंडभरून कौतुकही केलं. न्यूज १८ ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगडच्या पंच नगरीत राहणारा अवघ्या सहा वर्षांचा असलेला विभोर शर्मा रोज पहाटे ५ वाजता उठतो, शाळेत जातो आणि सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जातो. तो सध्या इयत्ता पहिलीत शिकत असून घराजवळील एका शाळेत जातो. १९ एप्रिल रोजी भगतसिंग शाखेचं कामकाज संपल्यानंतर मोहन भागवत त्याच्या घरी अचानक भेट देण्याकरता गेले होते. गेटजवळच विभोरच्या आजी कुसूम शर्मा, आई गरिमा आणि वडील दिवाकर शर्मा यांनी त्यांचं स्वागत केलं.
विभोर शाखेत सर्वांना आवडतो
मोहन भागवत यांनी शर्मा यांच्या कुटुंबात जवळपास एक तास घालवला. त्यांच्याशी चर्चा केली आणि विभोरच्या दैनंदिन आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विभोरला त्याचं नाव, कोणत्या वर्गात शिकतो, कोणत्या शाळेत जातो असे काही प्रश्नही भागवंतांनी त्याला विचारले. स्वतः अभियंता आणि स्वयंसेवक असलेले दिवाकर शर्मा यांनी सांगितले की, “पहिलीत शिकणारा विभोर गेल्या वर्षभरापासून स्थानिक शाळेत जातो. तो युध्द, दंड, समता यात भाग घेतो आणि संघाच्या प्रार्थनेत भाग घेतो. त्याने लाठीचे कौशल्य आणि व्यायाम लवकर आत्मसात केले आहेत. शाखेतील सर्वांना तो आवडतो.”
तो रोज शाखेत जातो
चार वर्षांपूर्वी एका आयटी कंपनीत काम केल्यानंतर नोएडाहून अलीगढला परतलेले दिवाकर पुन्हा त्यांच्या परिसरातील सकाळच्या शाखेत जाऊ लागले आहेत. “मी शाखेत जाऊन मोठा झालो आणि सरस्वती शिशु मंदिरात शिक्षण घेतले. जेव्हा मी अलीगढला परतलो तेव्हा मी माझ्या मुळांशी पुन्हा जोडले गेलो. मला जाताना पाहून माझा मुलगा उत्सुक झाला आणि माझ्यासोबत येऊ लागला. अधूनमधून भेट म्हणून सुरू झालेली ही गोष्ट आता सवय झाली आहे. तो ते चुकवू इच्छित नाही”, असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.
लाठीकाठीचेही घेतले प्रशिक्षण
विभोरची आई गरिमा यांनी त्याच्या शिस्तबद्ध दिनचर्येवर प्रकाश टाकला. “तो दररोज सकाळी ५ वाजता उठतो, त्याच्या आईवडिलांचे आणि आजीचे आशीर्वाद घेतो, एक तास अभ्यास करतो आणि नंतर शाळेसाठी तयार होतो. शाळा सुटल्यानंतर, तो वेळेवर गृहपाठ पूर्ण करतो आणि संध्याकाळी ६.१५ वाजता शाखेला निघतो. तो संध्याकाळी ७.१५ वाजता परत येतो आणि घरीही तो लाठीचा सराव करतो आणि आरएसएस गीत गातो”, असं त्याची आई म्हणाली.
त्या पुढे म्हणाल्या, “त्याने शाखेत जायला सुरुवात केल्यापासून त्याची शिस्त खूपच सुधारली आहे. तो अधिक लक्ष केंद्रित आणि आदरणीय झाला आहे. भागवतजी आमच्या घरी आले तेव्हा आम्ही थक्क झालो. त्यांनी आमच्यासोबत चहा घेतला, खजूर, नमकीन आणि बिस्किटे खाल्ली आणि विभोरच्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारले.”
‘मला राष्ट्राची सेवा करायची आहे, मी सैन्यात सामील होईन’
त्याच्या आईवडिलांच्या शेजारी बसलेल्या विभोरला त्याच्या महत्त्वाकांक्षांबद्दल विचारले असता तो आत्मविश्वासाने म्हणाला, “मी दररोज शाखेत जातो. आम्ही खेळतो आणि आपल्या देशाचे रक्षण करायला शिकतो. मला सैनिक बनून देशाची सेवा करायची आहे. मला भारतीय सैन्य खूप आवडते.” आरएसएस प्रमुखांशी झालेल्या संवादाची आठवण करून देताना विभोर पुढे म्हणाला, ” मोहन भागवतजींनी मला चॉकलेट दिले आणि शाखेत जात राहण्यास सांगितले. ते खूप दयाळू होते.”