जगभरात करोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच ओमायक्रॉनच्या बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वपूर्ण घोषणा केली असून करोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला WHO नं मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाची शिफारस केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचा आता जगभरातील १४९ देशांमध्ये प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने लिलिच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.

कुणाला औषध देता येईल?

Olumiant या नावाखाली उपलब्ध असलेलं हे औषध करोनाची तीव्र लक्षणं असणाऱ्या रुग्णांनाच देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईडसोबतच हे औषध देता येऊ शकेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

“ओमायक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना

GSK-Vir च्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला

दरम्यान, ओल्युमियांटसोबतच जीएसके-वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मात्र, ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक ठरत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित देशांनी या दोन्ही उपचार पद्धतींविषयी निर्णय घ्यायचा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who recommends eli lilly baricitinib olumiant for treatment sever covid patients pmw
Show comments