पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. भाजपानेच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका केली होती. काही दिवसांपूर्वी पुलवामामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झाले. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न आहे या जवानांना कोणी मारले ? जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचे नाव काय आहे ? भाजपा सरकारनेच मसूद अझहरची भारतीय तुरुंगातून सुटका केली असे राहुल गांधी कर्नाटकातील हावेरी येथील सभेत म्हणाले.
काँग्रेस दहशतवादासमोर झुकली नाही असे राहुल म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस काही दिवस शांत राहिली. त्यानंतर काँग्रेसने आता या मुद्यावरुन पंतप्रधान मोदींवर प्रखर हल्ला सुरु केला आहे. पुलवामा हल्ला सरकारचे अपयश असून हा हल्ला का रोखता आला नाही ? असा सवाल काँग्रेसने केला.
भाजपा, त्यांचे मंत्री आणि नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्याचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी आताचे नरेंद्र मोदी सरकार आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईची तुलना केली. काँग्रेसने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. फक्त इंदिरा गांधी यांनी बांगलादेशच स्वतंत्र केला नाही तर ९१ हजार पाकिस्तानी सैनिकांना आत्मसमर्पण करावे लागले असे सूरजेवाल यांनी सांगितले.