अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला नक्की गोळी मारली कोणी, याची एक नवी बाजू आता समोर आलीये. अमेरिकी नौदलाच्या कमांडोंनी एक मे २०११ रोजी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये केलेल्या कारवाईत दहशतवादी लादेनला ठार मारण्यात आले होते. 
अबोटाबादमधील लादेनच्या घरावर उतरून त्याला पहिली गोळी कोणी मारली, याची नवी बाजू एका मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील दाव्यावरून पुढे आलीये. ‘इस्क्वेअर’ मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकात ‘द शूटर’ असे टोपण नाव असलेल्या कमांडोची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्याने असा दावा केलाय की, नौदलाच्या कमांडोंनी केलेल्या कारवाईच्या दिवशी लादेनच्या डोक्यात त्यानेच दोन गोळ्या झाडल्या. लादेनच्या घरावर उतरल्यानंतर मी एकटाच त्याच्या तिसऱया मजल्यावरील खोलीत शिरलो आणि मीच त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या, असे त्याने म्हंटलंय.
‘सीएनएन’चे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक पीटर बर्गन यांनी मात्र लेखात ‘द शूटर’ने केलेला दावा साफपणे फेटाळून लावला. या कारवाईत सहभागी असलेल्या सहा कमांडोंची बर्गन यांनी मुलाखत घेतली होती. त्यात कारवाईच्यावेळी सुरुवातीला तिघेजण लादेनच्या घरावर उतरल्याचे या कमांडोंनी बर्गन यांना सांगितले होते. या तिघांमध्ये एक ‘द शूटर’ होता, दुसरा ‘द पॉईंट मॅन’ आणि तिसरा कमांडो मॅट बिसोनेट होता. बिसोनेट यानेच या कारवाईबद्दलचे पुस्तक लिहिले असून, काही दिवसांपूर्वीच ते प्रसिद्ध झाले.
कारवाई सुरू झाल्याचे कळल्यावर लादेनने आपल्या खिडकीतून डोकावून बाहेरच्या स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ‘द पॉईंट मॅन’ कमांडोने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये लादेन जबर जखमी झाला होता, असे बर्गन यांचे म्हणणे आहे. ‘द पॉईंट मॅन’ याने नंतर तिसऱया मजल्यावरील लादेनच्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी तिथे दोन महिला असल्याचे त्याला दिसले. या महिलांच्या अंगावर स्फोटके असण्याची शक्यता ‘द पॉईंट मॅन’च्या डोक्यात त्यावेळी आली. तितक्यातच आणखी दोन कमांडो त्या खोलीमध्ये आले आणि त्यांनी जमिनीवर पडलेल्या लादेनच्या छातीवर गोळ्या झाडल्या.
दरम्यान, ‘ईस्क्वेअर’ मासिकामध्ये छापून आलेल्या मुलाखतीनंतर या कारवाईतील सर्व कमांडोंनी संताप व्यक्त केलाय आणि त्यांनी ‘द शूटर’ कमांडोला आपल्या टीममधून बाहेर काढले असल्याचे समजते.

Story img Loader