जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख ट्रेडोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी करोना नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या लसीकरणावरून जी-२० देशांना चांगलंच ऐकवलं आहे. जगातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक करोना विरोधी लसी जी-२० देशांकडे गेल्यात. केवळ ०.६ टक्के लसी गरीब देशांना मिळाल्याचं मत गेब्रेयसस यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी कोणताही एकटा देश लसीकरण करून करोना साथीरोगातून मार्ग काढू शकत नाही, असा सूचक इशाराही दिला.
ट्रेडोस गेब्रेयसस म्हणाले, “जगभरातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक लसी या जी-२० देशांकडे गेल्यात. कमी उत्पन्न असलेल्या गरीब देशांना यातील केवळ ०.६ टक्के लसी मिळाल्या आहेत. या गरीब देशांमधील बहुतांश देश हे आफ्रिकेतील आहेत.”
हेही वाचा : करोना संसर्गाचे युरोप पुन्हा केंद्र होऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेनचा युरोपला इशारा
“आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याची प्रत्येक देशाची जबाबदारी आम्ही समजू शकतो आणि त्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, लसींचं न्यायबुद्धीने वाटप ही काही दयेने द्यावी अशी देणगी नाही, तर हे प्रत्येक देशाच्या हिताचं आहे. कोणताही देश लसीकरण करून एकट्यानं कोविड साथीरोगातून मार्ग काढू शकत नाही,” असा इशारा त्यांनी जगातील श्रीमंत देशांना दिला.
“करोना संसर्गाचे युरोप पुन्हा केंद्र होऊ शकते”
करोना संसर्गाबाबत युरोप हे पुन्हा एकदा जगाचे मुख्य केंद्र होऊ शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांनी दिला आहे. युरोपममधील ५३ देशांमध्ये गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर करोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर पुन्हा एकदा गेल्या वर्षाप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती ही युरोपमध्ये निर्माण होऊ शकते डॉ हांस क्लाज यांनी स्पष्ट केलं आहे.
युरोपमधील देशांकडे पुरेसा लशींचा साठा आहे. मात्र म्हणावं तसं लसीकरण झालेलं नाही. उलट काही देशांमध्ये ४० टक्के पण लसीकरण झालेलं नाही. असं असतांना विकसनशील देशांना लस पाठवल्या जात आहेत. तेव्हा उपलब्ध लसींद्वारे देशातील नागरीकांचे लसीकरण करावे, नाहीतर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती चिघळेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.