गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संत बाबा राम सिंह हे ६५ वर्षांचे होते. ते करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. हरयाणा आणि पंजाबबरोबरच जगभरामध्ये बाबा राम सिंह यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांनी अनेक शीख संघटनांची महत्वाची पदं भूषवली आहेत.
संत बाबा राम सिंह यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. तसेच ते धार्मिक उपदेशक म्हणूनही काम करायचे. मागील काही दिवसांपासून ते दिल्लीत होते आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत होते. त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिबीर ठेवलं होतं. त्यांनी या शेतकऱ्यांसाठी चादरीही वाटल्या होत्या. संत बाबा राम सिंह यांचा मठ करनाल जिल्ह्यातील सिंगडा गावात आहे. ते सिंगडावाले बाबा या नावाही लोकप्रिय होते. बाबा हे सिंगाडा येथील मठाबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवचनासाठी जायचे.
संत बाबा राम सिंह यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे त्यांच्या लाखो अनुयायांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीय. संत बाबा राम सिंह हे कायमच सर्व वादांपासून दूर राहिले. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणेसाठी खूप मोठं योगदान दिलं. शीख सामाजाबरोबरच सगळीकडे त्यांना मानसन्मान दिला जायचा.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटलं आहे?
संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटनुसार त्यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. “मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. ते आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे. कोणीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काही केलं नाही. अनेकांनी त्यांना मिळालेले सन्मान परत केले. हा अत्याचाराविरोधातील आवाज आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह,” असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.
सोनीपत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.