Who was Thomas Matthew Crooks : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावले. येथील सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. एक गोळी कानाला चाटून गेली असून ते जखमी झाले असले तरी त्यांच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर अमेरिकेसह जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने हल्लेखोराची ओळख पटवली असून २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने हा गोळीबार केला आहे.
थॉमस मॅथ्यू क्रुक्सने गोळीबार करताच सुरक्षा रक्षकांनी प्रतिहल्ला केला. यामुळे थॉमस क्रुक्सचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या स्टेजपासून अवघ्या १४० मीटर अंतरावरील एका छतावर क्रुक्स नेम धरून उभा होता. त्याच्याकडे एआर-१५ ही शैलीतील सेमी ऑटोमॅटिक रायफल होती. त्याच्या वडिलांकडे या रायफलचा परवानाही आहे. याच रायफलने त्याने गोळीबार केला. (Who was Thomas Matthew Crooks)
थॉमस मॅथ्यू क्रूक्स कोण होता? (Who was Thomas Matthew Crooks)
पेनसिल्व्हेनियामधील बेथेल पार्कमधील तो रहिवासी होता. तो यंदा पहिल्यांदाच ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्याचं मतदान करणार होता. त्याने २०२२ मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून शिक्षण घेतलं असून तो अत्यंत हुशार आणि शांत मुलगा होता, असं वर्णन रॉयटर्सने त्यांच्या वृत्तात केलं आहे. त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याचं वर्णन “आदर्श” असं केलं आहे. तो स्वतःमध्ये रमायचा, त्याने याआधी कधी राजकीय भूमिका घेतल्याचं आठवत नाही, असंही ते म्हणाले.
एफबीआयने म्हटले आहे की त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्येही प्रक्षोभक भाषा नाही किंवा त्यांना मानसिक आरोग्य समस्यांचा कोणताही इतिहास सापडला नाही. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर हिंसाचार किंवा तत्सम प्रकारांना प्रोत्साहन देणारी कोणतीही पोस्ट नसल्यामुळे अधिकारी त्याच्या राजकीय भूमिकेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
उत्तम नेमबाज नसतानाही…
एवढंच नव्हे तर तो उत्तम नेमबाज नसल्याने त्याला रायफल संघातूनही बाहेर काढण्यात आले होते, असं संघाच्या विद्यमान कर्णधाराने एपी या वृत्तसंस्थेला सांगितले. त्याच्या एका वर्गमित्राने एका मुलाखतीत असेही सांगितले की, क्रुक्सला संगणक चालवणे, गेम खेळणे आदी आवड होती. सार्वजनिक नोंदीनुसार, त्याचे वडील नोंदणीकृत रिपब्लिकन आणि आई नोंदणीकृत डेमोक्रॅट आहे. (Who was Thomas Matthew Crooks)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हल्ल्यावेळी काय घडले?
● बटलर टाऊनमध्ये मोकळ्या मैदानावरील सभेवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला.
● हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) घटनास्थळीच सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार.
● ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली असून त्यांचा जिवाला धोका नाही.
● अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली.
● हल्लेखोर रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत मतदार होता.
● त्याच्या वाहनामध्ये तसेच घरामध्ये तपास यंत्रणांना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळून आले आहे.
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध.