पुण्यातील जर्मन बेकरी येथे १३ जानेवारी २०१० या दिवशी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या वेळी यासिन भटकळसोबत असणारा अन्य आरोपी नेमका कोण होता, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली तसेच बंगळुरु पोलिसांनी याबाबत परस्परविरोधी दावे केले आहेत. यासिन भटकळ याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आल्याने त्याच्या जबानीतून यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात झालेल्या या स्फोटानंतर दहशतवादविरोधी पथकाने आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण ताब्यात घेतले होते. त्यानुसार हा स्फोट होण्यापूर्वी मिर्झा हिमायत बेग हे यासिनचे शिक्षक त्याच्यासोबत होते, असा दावा या पथकाने केला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास कक्षाने मात्र हा दावा खोडून काढला आहे. ही अन्य व्यक्ती म्हणजे मिर्झा बेग नसून कातिल सिद्दीकी होता आणि सिद्दीकी याने तसा कबुलीजबाबही दिला होता, असे या पोलिसांचे म्हणणे आहे. बंगळुरु पोलिसांनीही केलेल्या तपासात ही अन्य व्यक्ती म्हणजे सिद्दीकीच असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये सिद्दीकी याची तुरुंगात हत्या झाली तर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मिर्झा बेगने या शिक्षेला आव्हान दिले आहे. भारत आणि नेपाळ सीमेवर काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या यासिनच्या जबानीतून या प्रकरणातील सत्य बाहेर पडण्याची आशा आहे.

Story img Loader