गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार असल्यामुळे आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचालींना वेग आला आहे. पर्रिकर यांनी शुक्रवारी सकाळी पक्षाच्या सर्व आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. शनिवारी पुन्हा एकदा चर्चा केल्यानंतर पक्षाकडून नियोजित मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर केले जाईल, असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, पर्रिकर यांना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे. येत्या दहा तारखेला ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. स्वतः पर्रिकर यांनीही आपण उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात येणार असून, त्यामध्ये पर्रिकर यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश करण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्रिकर यांच्याकडे संरक्षणमंत्रीपद सोपविण्यात येणार आहे. गेले दोन दिवस पर्रिकर दिल्लीमध्ये होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. पर्रिकर यांच्या या दौऱयावेळीच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश पक्का समजला जात होता.
दरम्यान, गोव्यातील सध्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्सेकर आणि आर्लेकर हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा