Amritpal Singh Arrest : महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंबाज डे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर काल (२३ एप्रिल) शरण गेला. त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला आसामच्या कारागृहात पाठवण्यात आलं आहे. आसामच्या डिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या या कारागृहात का पाठवलं असेल असा प्रश्न आता विचारला जात आहे. याच कारागृहात त्याचे इतर आठ साथीदारही आहेत.
एनटीडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “या कारागृहात त्याच्या चळवळीशी संबंधित इतर अनेक गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. परंतु, येथे त्याला भाषेचा अडसर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इतर गुन्हेगारांशी संपर्क साधणं त्याला कठिण जाऊ शकतं. तसंच, डिब्रुगड हे अतिशय सुरक्षित असे कारागृह असून येथील स्थानिक शीख समुदाय खलिस्तानी चळवळीशी संबंधित नाहीत.”
सुरक्षेचे महत्त्व
हे कारागृह १७० वर्षे जुने असून या कारागृहातून पळून जाण्याचा घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे हे अतिशय सुरक्षित कारागृह असल्याचं म्हटलं जातं. डिब्रुगढ कारागृह हे शहराच्या अत्यंत मध्यभागी असल्याने गुन्हेगार पळून जाण्याच्या प्रयत्नात असले तरीही त्यांच्या तत्काळ मुसक्या आवळण्यात येतील, अशी या शहराची रचना आहे. म्हणून हे कारागृह सुरक्षेसाठी प्रसिद्ध आहे.
१९ मार्चपासून खलिस्तानी समर्थकांची धरपकड सुरू आहे. अमृतपालच्या चार समर्थकांना अटक केल्यानंतर त्यांना याच आसामच्या डिब्रुगड कारागृहात आणण्यात आले. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. तुरुंगात आता २४ तास बहुस्तरीय सुरक्षा असते.
पीटीआयला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “तुरुंग परिसरात आसाम पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. ब्लॅक कॅट कमांडो, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. तसंच, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालसिंगच्या समर्थकांना ज्या ठिकाणी ठेवंल आहे तेथील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले असून तिथे नवीन कॅमेर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोवीस तास लक्ष राहू शकेल.”
ऐतिहासिक महत्त्व काय?
डिब्रुगड कारागृह १८६० साली बांधण्यात आले होते. आसाम सरकारने जाहीर केलेल्या पाक्षिकानुसार, या तुरुंगात ६८० कैदी आहेत. आसाममधील तीन क्रमाकांचे हे कारागृह असून ऐतिहासिकदृष्ट्या या कारागृहाला अनन्यासाधारण महत्त्व आहे. उल्फा बंडावेळी अनेक नेत्यांना याच कैदेत ठेवण्यात आले होते.
अमृतपालला अटक की आत्मसमर्पण
पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत अमृतपालच्या अटकेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अमृतपालला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोलिसांनी रोडे गावात घेरले. पळण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याची कोंडी झाली.’’ कुख्यात खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले रोडे गावचा रहिवासी होता. गेल्या वर्षी याच गावातील कार्यक्रमात ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे अमृतपालकडे सोपवण्यात आली होती. अमृतपालला अटकेनंतर तातडीने विशेष विमानाने दिब्रुगढला नेण्यात आले. दिब्रुगढ तुरुंगात त्याच्या नऊ साथीदारांना ठेवण्यात आले आहे.