मागच्यावर्षी मे महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख सीमेवर अतिक्रमण केल्यानंतर भारत-चीनमध्ये सीमा वादाला सुरुवात झाली. परस्परांने इशारे, शाब्दीक बाचाबाची आणि धक्काबुक्की असे सुरुवातीला या वादाचे स्वरुप होते. पण १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनने आपला खरा विश्वासघातकी चेहरा दाखवला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे परिस्थिती चिघळली आणि वाद आणखी विकोपाला गेला.

चीनच्या पीएलएने नियोजनबद्धरित्या भारतीय सैन्यावर हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा यावेळी जशास तसे प्रत्युत्तर देत चीनला वठणीवर आले. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ सैन्य पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही कुठलाही तोडगा निघू शकला नव्हता. त्यानंतर अचानक एकाएकी बुधवार सकाळपासून मुख्य कळीचा मुद्दा असलेल्या पँगाँग टीएसओ सरोवर परिसरातून सैन्य माघारी सुरु झाली.

मागच्या नऊ महिन्यांपासून हाच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण त्यावेळी न ऐकणारा चीन अचानक कसा माघारीसाठी तयार झाला? पडद्यामागे नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊया. बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पँगाँग टीएसओ भागात सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाली. पण त्याआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांनी चीनमधील आपल्या समपदस्थांची चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर सहमती झाली.

पूर्व लडाखबाबतच्या आपल्या भूमिकेवर भारत ठाम राहिला. चीनचा कुठलाही दावा मान्य करायचा नाही, आपली एक इंचही भूमी सोडायची नाही, हा भारताचा निर्धार कायम होता. त्यानंतर चीनला अखेर नमते स्वीकारुन माघारी फिरावे लागले, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

“भारताने सुद्धा आपली शस्त्रसज्ज वाहने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. पण चीनचा स्वभाव लक्षात घेता, परिस्थिती बिघडली तर प्रत्युत्तर देण्याची योजना देखील तयार आहे” असे नरेंद्र मोदी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जगातील सर्वात मोठे लष्कर, सैन्य शक्ती आणि महासत्ता असल्याचे चीन दाखवतो. पण चीनला त्याच्या कुठल्याही उद्दिष्टामध्ये यशस्वी होऊ न देता पुन्हा कायमस्वरुपी तळावर पाठवून देण्यात भारत यशस्वी ठरला आहे.

Story img Loader