टूजी आणि कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव येऊ नये यासाठी माजी महालेखापाल विनोद राय यांच्यावर जर दबाव आणण्यात आला होता, तर त्यांनी त्याबाबत एफआयआर का नोंदविला नाही, असा सवाल करून काँग्रेसने आता राय यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
राय यांच्या आरोपामागे राजकीय हेतू आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या बाबत प्रथम आरोप केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. राय यांनी केलेला आरोप दुसरेतिसरे काहीही नाही तर तोच प्रकार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे.माजी महालेखापालांचे भाजपशी लागेबांधे आहेत, असे सिंघवी यांनी सूचित केले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही कॅगने ताशेरे ओढले होते. त्याबाबत माजी लेखापालांनी एकही शब्द न उच्चारल्याबद्दल सिंघवी यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मनमोहन सिंग यांची ‘चूक’ ?
स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी आपण पत्र पाठवूनही त्यावर कारवाई न करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘चूक’ केली असावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी व्यक्त केली. आपण मनमोहन सिंग यांच्या ध्यानी ही बाब आणून दिली होती परंतु त्याचे गांभीर्य त्यांच्या ध्यानी आले नसावे आणि त्यामुळेच त्यांनी कृती केली नाही, असे कमलनाथ म्हणाले.

Story img Loader