उत्तर प्रदेशच्या मुझफ्फर नगरमध्ये मुस्लिम मुलाच्या कानाखाली वाजवल्याचे प्रकरण ताजे असतानाच दिल्लीतूनही असाच एक प्रकार उजेडात आला आहे. “फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत?” असा सवाल दिल्लीतील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने चार विद्यार्थ्यांना रागाच्या भरात विचारला आहे. या प्रकरणावरून आता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या जबाबानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली पोलिसांनी हेमा गुलाटी या शिक्षिकेविरोधात तकार दाखल झाली असून तिला अटक केली आहे. दिल्लीतील गांधी नगर येथील सर्वोदय बाल विद्यालयात हा प्रकार घडला आहे. चार विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याच्या पालकांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली. विद्यार्थ्याने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, हेमा गुलाटी यांनी बुधवारी धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य केले आहे. कुराण आणि मक्कातील कब्बा या दगडाविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याचं मुलाने तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा >> मुझफ्फरनगरमधील वादग्रस्त शाळा तिसऱ्या दिवशीही बंद

शिक्षिका काय म्हणाली?

“फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात गेला नाहीत. तुम्ही भारतात राहिलात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तुमचं काहीच योगदान नाही”, असं या शिक्षिकेने म्हटलं असल्याचं विद्यार्थ्याने तक्रारीत नमूद केलं आहे. शुक्रवारी सायंकाळी विद्यार्थ्याच्या पालकांनी ही तक्रार केली आहे. दरम्यान, शिक्षिकेने केलेल्या अशा वक्तव्यांमुळे शाळेत जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तिच्यावर लवकरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

हेही वाचा >> नूहमध्ये कडेकोट बंदोबस्त; शिवमंदिरात पूजेसाठी प्रशासनाची परवानगी

अशा शिक्षकांना शाळेतून काढून टाका

विद्यार्थ्याच्या आईने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “जर या शिक्षिकेला शिक्षा झाली नाही तर, इतरांकडूनही अशीच वक्तव्ये केली जातील.शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं. त्यांना ज्ञात नसलेल्या गोष्टींविषयी त्यांनी बोलू नये. विद्यार्थ्यांमध्ये अशाप्रकारे भेदभाव करण्यात काही अर्थ नाही. अशा शिक्षकांना शाळेतून काढून टाकलं पाहिजे, अशा शिक्षकांनी कोणत्याच शाळेत शिकवू नये.”

आप आमदारही संतापले

स्थानिक आमदार आणि आम आदमी पक्षाचे नेते कुमार वाजपेयी पीटीआयला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हे अत्यंत चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. धर्म आणि धार्मिक स्थळांविषयी कोणत्याही शिक्षकाने अपमानजनक वक्तव्ये करू नयेत, अशा लोकांना अटक व्हावी.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why didnt you go to pak delhi teacher charged for comments in class teacher booked sgk