Vande Bharat Train Speed: वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशातील रेल्वे प्रवास बदलला आहे. सेमी हाय स्पीड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या ट्रेनमुळे रेल्वे प्रवासाचे एक नवे युग सुरू झाल्याचे सांगितले जाते. आधुनिक बनावटीच्या या ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाची सुविधा तर उपलब्ध झालीच आहे, त्याशिवाय आर्थिक वेगही चांगला वाढला आहे. चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली गेली आहे. वंदे भारत ताशी १६० किमी वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी करण्यात आल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. संसदेत काही खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. अधिक वेगाने धावण्याची क्षमता असतानाही वंदे भारत एक्सप्रेस सरासरी वेगापेक्षा कमी वेगाने चालवली जात असल्याचा तक्रार खासदारांनी केली. वंदे भारत ट्रेन तिच्या मूळ वेगाने चालविण्यासाठी सरकार कोणती योजना आणि धोरण आखत आहे, याबद्दलची माहिती खासदारांनी मागितली.
खासदारांच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनचा वेग फक्त तिच्या क्षमतेवर अवलंबून नाही. तर ज्या रूळांवरून ही ट्रेन धावणार आहे, त्याचीही क्षमता महत्त्वाची ठरते. रेल्वेबरोबरच रेल्वेच्या रूळांची डागडुजी आणि त्यांची क्षमता वाढविण्यासंदर्भात काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
२०१४ साली देशातील ३१,००० किमी रूळावरून ताशी ११० किमी वेगाने ट्रेन धावत होत्या. आता त्यात चांगली सुधारणा झाली असून सध्या ८०,००० किमी रूळावरून वेगाने रेल्वे धावत आहेत, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
देशात किती वंदे भारत एक्सप्रेस?
देशातील विविध भागात सध्या एकूण १३६ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. सर्वच मार्गावरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. काही मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवातीला प्रवासी मिळाले नाहीत, मात्र आता सर्वच मार्गावरील वंदे भारत ट्रेन भरून वाहत आहेत.
वेगाच्या बाबतीत वंदे भारतने शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसलाही मागे टाकले आहे.