इराणने बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेच्या दोन मोठ्या तळांवर क्षेपणास्रं आणि ड्रोन हल्ले केल्यामुळे उभय देशांमधील तणाव वाढला आहे. इराणच्या या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुली जखमी झाल्या आहेत, असा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC)ब लुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई केली आहे. मेहर या इराणी सरकारी वृत्तसंस्थेनुसार, कुहे सब्ज भागात जैश उल-अदलचे मोठे तळ होते. हे तळ क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून नष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, इराणने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे पाकिस्ताने इराणचा निषेध नोंदवला आहे.
पाकिस्तानच्या निषेधानंतर इराणने या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन म्हणाले, आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या एका दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्याचा आणि गाझामधील युद्धाचा काहीही संबंध नाही.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये इराणच्या पाकिस्तानमधील एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तेव्हा इराणचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, आम्ही कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य केलं नाही. आम्ही केवळ जैश-अल-अदलच्या तळांवर हल्ला केला. आम्ही क्षेपणास्रं आणि ड्रोन हल्ल्याद्वारे पाकिस्तानमधील कुठल्याही नागरिकाला लक्ष्य केलं नाही. या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी बातचीत केली. या दहशतवाद्यांनी इराणमध्ये आमच्याविरोधात काही दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या. यांच्या हल्ल्यात आमचे जवान शहीद झाले होते. त्याविरोधात आम्ही ही कारवाई केली.
हे ही वाचा >> इराणचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना लहान मुलांचा मृत्यू
हुसैन अमीर अब्दुल्लाहियन म्हणाले, आम्ही केवळ पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. तिथल्या नागरिकांवर हल्ला केला नाही. आम्ही या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशीदेखील बातचीत केली. त्यांना आश्वासन दिलं आहे की, आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर करतो. परंतु, ते करत असताना आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही. आम्ही जे काही केलं ते पाकिस्तानच्या आणि इराकच्या सुरक्षेसाठी केलं. दोन्ही देशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा हल्ला केला होता.