राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ११० हून जास्त दिवस होऊन गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या टी-शर्टवरून सातत्याने टीका होताना दिसते आहे. राहुल गांधी हे टी-शर्ट घालतात, स्वेटर घालत नाहीत. राहुल गांधींचं टी-शर्ट अमुक किंमतीचं आहे. अशा सगळ्या चर्चा आणि टीका होत आहेत.राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावर दिलखुलास उत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
मला एक कळत नाही, माझ्या टी शर्टवर एवढा आक्षेप का घेतला जातो? एवढी चर्चा का केली जाते आहे. या टी-शर्टमध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं काय आहे? इथे कुणीही टी शर्ट घातलेला नाही का? तुम्हाला काय वाटतं मी स्वेटर घालू? त्यापेक्षा मी एक काम करतो भारत जोडो यात्रा संपल्यानंतर मी एक व्हिडिओ तयार करतो. त्यात मी हे सांगेन की टी-शर्ट घालून कसं चालतात. थंडी कशी कमी करतात? तेपण मी सांगेन. पण मला सांगा तुमचा प्रश्न काय ते सांगा. त्यावर पत्रकार म्हणाला की टी-शर्टचं रहस्य काय? त्यावर राहुल गांधी हसत म्हणाले तुम्ही स्वेटर घातला आहे कारण तुम्हाला थंडी वाजेल ही भीती वाटते. मला थंडीची भीती वाटत नाही. आज मला वाटतं मोदीजी पत्रकार परिषद तर घेत नाहीत मी त्यांचेही काही मुद्दे तुम्हाला सांगू शकतो. मला आत्ता थंडी वाजत नाही. पण मला जर थंडी वाजण्यास सुरूवात झाली तर मी स्वेटर नक्की घालेन.

राहुल गांधी आणखी काय म्हणाले आहेत?
भाजपच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी जर एकजूट केली तर भाजपच्या अडचणी वाढतील. आत्ता भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मी देशातल्या जनतेचा आवाज ऐकतो आहे. ही ती जनता आहे जी आपल्याला मतदान करते. त्यांना असं वाटतं की विरोधी पक्ष बळकट झाला तर भाजपला निवडणूक लढणं अवघड जाईल. विरोधी पक्षांमध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक आहे. जर आपण एक सक्षम विरोधक म्हणून उभे राहिलो तर लोकांचा पर्यायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की बदलू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रेत अनेक विरोधी पक्षातले लोक सहभागी झाले त्यावर राहुल गांधी म्हणाले की भारत जोडो यात्रा ही देश जोडणारी यात्रा आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी कुठलंही बंधन किंवा आडकाठी नाही. अखिलेश यादव, मायावती हे सगळे आपल्या देशात प्रेम असावं, एकमेकांमध्ये आपुलकी असावी असं वाटणारे लोक आहेत. यापैकी कुणालाही हिंसा नको आहे. त्यामुळे भारत जोडण्यासाठीच ते या यात्रेत सहभागी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there so much disturbance because of the t shirt i do not wear a sweater because i am not scared of winter ask rahul gandhi scj