Sudiksha Konanki News: अमेरिकेत शिकणारी भारतीय वंशाची २० वर्षीय विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी ही ६ मार्च रोजी डोमिनिकन रिपब्लिक येथील समुद्रकिनाऱ्यावरून अचानक बेपत्ता झाली होती. १२ दिवसांपासून स्थानिक पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र तिचा शोध लागलेला नाही. तसेच ती समुद्रात बुडाली असा संशय व्यक्त केला गेला. मात्र त्याबद्दलही अद्याप ठोस पुरावा हाती लागलेला नाही. यानंतर तिच्या पालकांनी आपल्या मुलीला मृत घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
एनबीसी न्यूजने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, डोमिनिकन रिपब्लिक राष्ट्रीय पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सुदीक्षाच्या कुटुंबियांनी त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुलीला मृत घोषित करावे, अशी मागणी केली आहे. मात्र यावर माध्यमांशी बोलण्यास पालकांनी नकार दिला.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, सुदीक्षाबरोबर तिचा मित्र जोशुआ रिबे शेवटचा दिसला होता. त्यामुळे डोमिनिकन रिपब्लिक पोलिसांनी त्याचा पासपोर्स जप्त केला आहे. ॲटर्नी जनरल येनी बेरेनिस रेनोसो यांनी मागच्या आठवड्यातच जोशुआ रिबेची सहा तास चौकशी केली होती. तथापि, रिबेला बेपत्ता प्रकरणात संशयित मानले गेलेले नाही. तसेच त्याच्यावर अद्याप कोणताही आरोप ठेवला गेलेला नाही.
सुदीक्षांच्या पालकांनी लिहिलेल्या पत्रात सध्या सुरू असलेल्या तपासावर समाधान व्यक्त करत तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच जोशुआ रिबने तपास यंत्रणांना सहकार्य केले असल्याचेही पालकांनी सांगितले.
समुद्रकिनारी आढळले होते कपडे
पिट्सबर्ग विद्यापीठाची विद्यार्थीनी असलेली सुदीक्षा कोनांकी (वय २०) ही ६ मार्च रोजी पहाटे ५.५० वाजता पुंता काना येथील एका उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये शेवटची दिसली होती. याच दिवशी पहाटे ४.१५ वाजता सुदीक्षा तिचा मित्र जोश रिबेबरोबर हातात हात घालून चालताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. यावेळी तिने परिधान केलेले कपडे पोलिसांना समुद्रकिनारी आढळून आले आहेत.
सुदीक्षा कोनांकी कोण आहे?
सीएनएनच्या वृत्तानुसार, सुदीक्षा कोनांकीचे कुटुंब मूळचे भारतातील आहे. २००६ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर ते परदेशात स्थायिक झाले. डोमिनिकन रिपब्लिक येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीक्षा ही पीट्सबर्ग विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते. याआधी ती थॉमस जेफरसन सायन्स टेक्नॉ़लॉजी या महाविद्यालयात शिक्षण घेत होती.