Kathmandu Pro-Monarchy Restoration Movement: आपल्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ पाहण्यास मिळत आहे. हजारो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळमध्ये राजेशाहीची पुन्हा एकदा मुहुर्तमेढ व्हावी, अशी लोकांची मागणी आहे. पण लोकशाही मार्गावर चालत असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही येणे इतके सोपे नाही. २४० वर्ष टिकलेल्या राजेशाहीविरोधात नेपाळने विद्रोह केला होता. नेपाळचे माजी शासक राजे ज्ञानेंद्र शाह हे पुन्हा एकदा काठमांडूमध्ये परतले असून हजारो लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी काठमांडूच्या रस्त्यावर एकच गर्दी केली. यामुळे नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार का? अशी शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी काठमांडूच्या रस्त्यांवर ज्ञानेंद्र शाह यांचे स्वागत करण्यासाठी उसळलेल्या गर्दीची एकच मागणी होती. ती म्हणजे राजेशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी. राजधर्माबरोबरच हिंदू राष्ट्राचीही पुनर्स्थापना केली जावी, अशीही मागणी केली जात आहे. राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी काठमांडू शहरात जवळपास १० हजार लोक आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक जमले होते. तर राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनुसार हा आकडा ४ लाख असू शकतो, असे सांगितले जाते.
राजे परत या, लोकांची घोषणाबाजी
ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. “राजासाठी शाही राजवाडा मोकळा करा, राजे तुम्ही परत या आणि देश वाचवा, आमचा राजा अमर रहे, राजेशाही जिंदाबाद, अशा प्रकारची घोषणाबाजी केली गेली. यावेळी राजेशाहीचा समर्थक पक्ष राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचेही अनेक नेते आणि कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. ज्ञानेंद्र शाह मागच्या दोन महिन्यापासून राजधानी काठमांडूपासून दूर होते.
हिंदू राजेशाही लोकांना का हवी आहे?
नेपाळ हे शेवटचे हिंदू राजेशाही असलेले राष्ट्र होते, असे मानले जाते. येथील राजा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या सैन्याचा आढावा घेत असत. तसेच इंद्र यात्रा उत्सवाच्या दरम्यान संरक्षक देवी कुमारीचा आशीर्वाद घेत असत. २००६ साली झालेल्या जनआंदोलनामुळे नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली. त्याआधी २४० वर्ष नेपाळ हिंदूराष्ट्र म्हणून ओळखले जात होते. मात्र २००८ साली नेपाळ लोकतांत्रिक राष्ट्र बनले. पण आता नेपाळच्या जनतेला पुन्हा एकदा राजेशाही हवी आहे.
कारण काय?
२००८ साली राजेशाहीचा शेवट झाल्यानंतर आतापर्यंत १३ सरकारांनी देश चालवला आहे. नेपाळमधील बहुसंख्य जनतेला वाटते की, लोकशाही व्यवस्थेमुळे शासनव्यवस्था अपयशी ठरली आहे. भ्रष्टाचार, आर्थिक ताण आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यासाठी लोकांना आता पुन्हा राजेशाही व्यवस्था हवी आहे. काही काळापर्यंत राजेशाहीचे कट्टर विरोधक असलेल्यांचाही विरोध आता हळूहळू मावळू लागला असून ज्ञानेंद्र शाह यांच्या हातात देशाची कमान द्यायला हवी, असे त्यांचे मत होत आहे. असे असले तरी नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही इतक्या सहज येईल, असे नाही.