देशात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या बलात्कारावर सगळेच बोलताहेत, पण एका साधूवर बलात्काराचा आरोप झाल्याबद्दल कोणीच बोलत नाही, असा प्रश्न संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सोमवारी लोकसभेमध्ये उपस्थित केला. 
मुंबईत गेल्या गुरुवारी संध्याकाळी महिला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेत निवेदन केले. त्यानंतर शरद यादव यांनी आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचा विषय उपस्थित केला.
ते म्हणाले, इतर ठिकाणी झालेल्या बलात्कारांबद्दल सगळेच बोलताहेत. मात्र, एक साधू जो तमाशा करतोय, त्यावर बोलायला कोणीच तयार नाही. त्या साधूला अटक करून त्याला शिक्षा करा, म्हणजे समाजामध्ये योग तो संदेश जाईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे त्याबद्दल राज्यांकडून माहिती मिळाल्याशिवाय केंद्र सरकार काही बोलू शकत नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

Story img Loader