पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘काँग्रेस मागच्या दाराने दहशतवादाशी संबंधित लोकांशी राजकीय वाटाघाटी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. त्याबद्दल निवडणूक आयोग त्यांच्याकडे पुरावे का मागत नाही?’’ असा सवाल  राज्यसभा सदस्य कपिल सिबल यांनी आयोगाला केला.

काँग्रेसने एका जाहिरातीत भाजपविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून पुराव्यांची मागणी काँग्रेसकडे करण्यात आली. त्याचा संदर्भात सिबल यांनी ही प्रतिक्रिया दिली. वृत्तपत्रांत भाजपविरुद्ध प्रकाशित ‘भ्रष्टाचाराचे दरपत्रक’ या जाहिरातीसंदर्भात निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या कर्नाटक शाखेला नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात भाजपने आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे एकगठ्ठा मतदानासाठी काँग्रेसने दहशतवादाला आश्रय दिला, या मोदींनी केलेल्या आरोपांवर कारवाईची मागणी शनिवारी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

मोदींचे केवळ ‘जॅकेट’ प्रसिद्ध : खरगे

कलबुर्गी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केवळ ‘जॅकेट’ प्रसिद्ध असून हे जॅकेट ते दररोज चार वेळा बदलतात, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी त्यांच्यावर हल्ला चढवला. रा. स्व. संघ आणि भाजप यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा मुद्दा खरगे यांनी पुन्हा उपस्थित केला.

भ्रष्टाचार, बेरोजगारी हाच खरा दहशतवाद -प्रियंका

कर्नाटकात सध्या भ्रष्टाचार, लूटमार, भाववाढ आणि बेरोजगारी हाच खरा दहशतवाद असून त्याला आळा घालण्यात सत्तारुढ भाजपला अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी रविवारी केली. दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मूदबिद्री येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. देशात कोणत्याही ठिकाणी निवडणूक असली की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अन्य नेते अतिरेकी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात, असे त्यांनी सांगितले.  त्या म्हणाल्या की, मोदींसह हे भाजपचे नेते लोकांच्या खऱ्या प्रश्नांबाबत बोलत नाहीत. त्यांना मी सांगू इच्छिते की भाववाढ, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा ४० टक्के भ्रष्टाचार हा खरा दहशतवाद आहे. भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने दिली जातात. पण, कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत भाजपने काय केले, हे पाहूनच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader