पंतप्रधानांनी सीबीआय आणि रॉच्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी का बोलावले ? चौकशीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता का ? पंतप्रधानांनी काय सूचना केल्या ? असंवैधानिक पद्धतीने तपासात दखल देण्याचा हा प्रकार नव्हे का, अशा प्रश्नांची सरबत्तीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.

यूपीए सरकारमधील मंत्र्यांनी न्यायालयात देण्यात येणारे प्रतिज्ञापत्र पाहिल्यानंतर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पंतप्रधान काय करत आहेत ? सीव्हीसी गप्प का आहे ? का त्यांनाही याप्रकरणी वरुन काही आदेश येत आहेत ? पंतप्रधान एक-एक महत्वाच्या संस्था कट रचून संपवत आहेत का ? पंतप्रधानांनी सीबीआयची स्वायत्तता संपवून त्यांना बाहुले बनवले आहे.

भारतातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयच्या दुरवस्थेसाठी फक्त पंतप्रधान जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी या तपास संस्थेचा राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी दुरुपयोग केला आहे. संपूर्ण प्रकरणात पंतप्रधानांची भूमिका संशयास्पद आहे.

पंतप्रधान असंवैधानिक पद्धतीने याप्रकरणात दखल देत आहेत. अस्थाना यांचे नाव न घेता सुरजेवाला म्हणाले की, गोधरा प्रकरणात क्लिन चिट देण्याच्या बदल्यात सीबीआयमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली का, असा सवालही उपस्थित केला.

Story img Loader