केंद्राने जनतेसाठी काहीही केले नाही असे म्हणत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. यासंबंधीची चर्चा लोकसभेत सुरू असताना लक्षवेधी ठरले ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण. आपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारने न केलेल्या कामांचा पाढाच वाचला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य करायचे होते. मोदीजी बार जाते हैं असे ते बाहर या शब्दाऐवजी बोलून बसले आणि सुरुवातीलाच लोकसभेत खासदारांचा हशाही पिकला.
त्यानंतर राहुल गांधी यांनी जे आरोप केले त्यात राफेल करार झालाच नाही असा आरोप केला, मोदी हे देशाचे चौकीदार नाही तर फक्त व्यापाऱ्यांचे भागीदार आहेत असे म्हटले. त्यानंतर लोकसभेत बराच गदारोळ माजला. हा गदारोळ इतका प्रचंड होता की लोकसभेचे कामकाज काही काळ स्थगित करावे लागले. कामकाज जेव्हा पुन्हा सुरू झाले तेव्हा राहुल गांधी यांनी हिंदू असल्याचा उल्लेख केला. ‘होय मी हिंदू आहे’ असे राहुल गांधी यांनी म्हटले.
इतकेच नाही काँग्रेस आणि संघाचे लोक मला पप्पू समजतात हे मला ठाऊक आहे, मात्र माझ्या मनात त्यांच्याविषयी मुळीच तिरस्कार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले. त्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या जागेवर जाऊन गळाभेटही घेतली. या गळाभेटीनंतर जेव्हा ते जागेवर येऊन बसले तेव्हा आपल्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहात त्यांनी त्यांना डोळाही मारला.
राहुल गांधींनी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या भाषणादरम्यान केली. त्यांनी देशाचा उल्लेख भारत नाही, हिंदुस्तान केला. त्यांनी हा देश काय आहे हे समजून दिल्याबद्दल भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपहासात्मक आभार मानले. एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करण्याची महात्मा गांधींच्या संस्कृतीशी त्यांनी स्वत:ची नाळ जोडली. माझ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष असेल परंतु माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात द्वेष नाही असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात भारतीय संस्कृतीची जी काही वैशिष्ट्य मानली जातात ती सगळी मला वंदनीय असल्याचे सांगताना हीच काँग्रेसची ओळख असल्याचे राहुल म्हणाले.
इतकंच नाही तर तुम्हा सगळ्या भाजपावासियांना मी काँग्रेसमय करीन असा पणही त्यांनी केला. या सगळ्या गोष्टींची नीट सांगड लावली तर हिंदूंची तारणहार मानली जाणारी भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थी हिंदू नसून ती अभिप्रेत असलेली मूल्ये बाळगणारी काँग्रेस व मी स्वत: हिंदू असल्याचे सांगत त्यांनी हिंदू जनमानसाला आपलंसं करायचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
काही दिवसांपूर्वीच मुस्लिम काँग्रेस या संज्ञेवरून गदारोळ झाला असताना काँग्रेस ही हिंदूविरोधी असल्याचा शिक्का बसू नये असा जाणीवपूर्वक प्रयत्न राहुल यांनी केलेला दिसून येतो आणि त्याचं प्रतिबिंबच त्यांच्या मी हिंदू आहे या वाक्यात पडलं असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली गळाभेट हा चर्चेचा विषय ठरली. कारण पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अध्यक्षाने भर लोकसभेत राजकीय शिष्टाचार तोडून मोदींची गळाभेट घेतली. तसेच मी हिंदू आहे हेदेखील त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न भाषणातून केला. आता प्रश्न हा आहे की राहुल गांधी यांना ही गरज का भासली असावी? मी हिंदू आहे हे सांगण्यामागे सातत्याने होणाऱ्या टीकेला उपरोधिकपणे उत्तर देण्याचा हा प्रयत्न होता.
राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून ते आजवरच्या त्यांच्या प्रवासाचा विचार केला तर सुरूवातीला राजकारणात नवखे वाटणारे राहुल गांधी आजच्या घडीला खूपच परिपक्व झाले आहेत. त्यांच्या पक्षाला अर्थात काँग्रेसला ते कशी दिशा आगामी काळात देतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र लोकसभेत हिंदू असल्याचे जाहीरपणे सांगणे हेच त्यांच्या हिंदुत्त्वाचे कार्ड असल्याचे दिसून येते आहे. लोकसभेत मी हिंदू आहे हे सांगणे म्हणजे भाजपासारख्या कट्टर पक्षासोबत राजकारण कसे करायचे हे त्यांना चांगलेच उमजल्याचे लक्षण आहे. येत्या काळात राहुल गांधी यांची राजकीय प्रगल्भता आणखी वाढली तर कदाचित निवडणुकांचे निकालही वेगळे असू शकतात. भारताचे पंतप्रधान होणे हे राहुल गांधीचे स्वप्न आहे. ते पूर्ण होईल की नाही याबद्दल तूर्तास भाष्य करणे घाईचे ठरेल. मात्र लोकसभेत त्यांनी केलेले भाषण आणि मोदींची गळाभेट घेण्याचे धाडस हे त्यांना राजकारणाच्या वेगळ्या वळणावर घेऊन जाईल यात शंका नाही.
समीर जावळे