|| अनिकेत साठे

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपल्या भात्यातील सुखोई ३० एमकेआय या आधुनिक विमानाऐवजी त्याच्यापेक्षा आकाराने निम्म्याने असणाऱ्या मिराज २००० या विमानांचा वापर केला. त्यामागे वैविध्यपूर्ण कामगिरीची मिराजची क्षमता हे कारण. त्याने अचूक ठिकाणी  नेमका मारा केला. रडारवर आपले अस्तित्व अधोरेखीत होऊ नये म्हणून अतिशय कमी उंचीवरून विमानाला मार्गक्रमण करावे लागते. अशावेळी वैमानिक पूर्णपणे स्वयंचलित प्रणालींवर विसंबून असतो. नुतनीकरणामुळे मिराजच्या तंत्रज्ञानात विलक्षण बदल झाले. प्रहारक क्षमता विस्तारली. या कारवाईने तेच अधोरेखीत केल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवाई दलाच्या ताफ्यात हल्ले चढविण्यासाठी आणि हवाई सीमांच्या रक्षणासाठी सुखोई एमकेआय ३० या अत्याधुनिक विमानापासून ते मिराज, जॅग्वॉर, मिग २९ आणि मिग श्रेणीतील इतरही लढाऊ विमाने आहेत. त्यात सुखोई सरस मानले जाते. विस्तीर्ण प्रदेशात बॉम्बचा वर्षांव करण्याची त्याची क्षमता आहे. सात ते आठ टन वजनाची शस्त्रास्त्रे आणि अणूबॉम्बही ते वाहून नेऊ शकते. दोन इंजिन असलेल्या सुखोईची हवेत वेगवेगळ्या कसरती करण्याची क्षमता विलक्षण आहे. इंजिनद्वारे सोडल्या जाणाऱ्या हवेच्या झोताच्या आधारे ते अकस्मात वळण घेऊन पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या विमानाला धोबीपछाड देऊ शकते. अचानक वेग कमी करून वरच्या दिशेने वळण्याच्या ‘थ्रस्ट व्हेक्टरिंग‘ तंत्राच्या मदतीने ते विमानविरोधी क्षेपणास्त्रालाही चकमा देते. रडारवर अस्तित्व अधोरेखीत होऊ न देण्यासाठी त्यात खास व्यवस्था आहे. शत्रूकडून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांची माहिती देणारी यंत्रणा आहे. तब्बल ५५ हजार फूट उंचीवरून आणि ध्वनिहून अधिक म्हणजे ताशी दोन हजार ६५० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने ते शत्रूचा प्रदेश पालथा घालू शकते.

असे असतानाही हवाई हल्ल्यांसाठी मिराजचा वापर करण्यात आला. त्यातच त्याचे सामर्थ्यदडलेले आहे. याचा उलगडा मिराजचे नुतनीकरण करणाऱ्या हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या माजी प्रमुखांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. राफेल विमान बनविणाऱ्या डेसॉल्ट कंपनीचेच मिराज हे विमान आहे.

अडीच दशकांपूर्वी खरेदी

पाकिस्तानला अमेरिकेकडून एफ १६ विमाने मिळाल्यानंतर भारताने साधारणत: अडीच दशकांपूर्वी मिराजची खरेदी केली होती. लढाऊ विमानाच्या कामगिरीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रणाली अतिशय महत्वाची ठरतात. आधुनिक श्रेणीच्या विमानात तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत असते.  या विमानांच्या नुतनीकरणाअंतर्गत आधुनिक रडार आणि दिशादर्शन प्रणाली, काचेची नवीन कॉकपिट, कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती डिजिटल स्वरुपात समोर दिसण्याची व्यवस्था करण्यात आली.