Laurene Powell Jobs in Mahakumbh: आयफोनची निर्माती कंपनी ॲपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराज येथे आल्या आहेत. तत्पूर्वी शनिवारी त्यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाश नंदगिरी महाराजही होते. भारतीय पारंपरिक पोशाखात लॉरेन यांनी मंदिरात हजेरी लावली. यावेळी त्या चर्चेचा विषय ठरल्या. स्वामी कैलाश नंदगिरी यांनी लॉरेन यांना ‘कमला’ असे नावही दिले आहे.

मात्र लॉरेन जॉब्स यांची ही भेट काहीशी वादात अडकली आहे. त्यांना काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंगाला हात लावून दर्शन घेऊ दिले नाही, असा आरोप केला जात आहे. शिवलिंगाला स्पर्श करण्यापूर्वी त्यांना रोखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणानंतर निरंजनी आखाड्याच्या कैलाश नंदगिरी महाराज यांनी सविस्तर प्रतिक्रियाही दिली आहे.

हे वाचा >> Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?

काय म्हणाले कैलाश नंदगिरी महाराज?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना कैलाश नंदगिरी महाराज म्हणाले की, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. नियमानुसार त्यांना शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी दिली नाही. भारतीय परंपरेनुसार बिगर हिंदू लोकांना शिवलिंगाला स्पर्श करता येत नाही. त्यांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊ दिले. आचार्य आणि शंकराचार्यांची ही जबाबदारीच आहे की, आपल्या धर्माचे नियम पाळले गेले पाहीजेत. त्या आमच्यासह मंदिरात आल्या, त्या आम्हाला मुलीसारख्या आहेत. त्या भारतीय परंपरा समजून घेत आहेत. त्या महाकुंभ मेळ्यातही उपस्थित राहणार आहेत.

लॉरेन जॉब्स आता ‘कमला’ झाल्या

स्वामी कैलाश नंदगिरी महाराज पुढे म्हणाले, त्या शिष्या असल्यामुळे माझ्या मुलीप्रमाणे आहेत. त्यांना मी कमला असे नाव दिले आहे. तसेच माझे गोत्रही मी त्यांना दिले आहे. त्या दुसऱ्यांदा भारतात आल्या असून त्या काही दिवस कुंभ मेळ्यात राहतील. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या गुरुजींना विचारू शकतात. आपली परंपरा जगभरात पसरायला हवी, असे मला वाटते. पण त्या परंपरेला विचार, सिद्धांत आणि आध्यात्माची बैठक असायला हवी. आध्यात्मात कोणत्याही स्वार्थाला थारा नाही.

लॉरेन जॉब्स त्यांच्या ६० सहकाऱ्यांसह रविवारी प्रयागरजाचा दौरा करणार आहेत. तसेच येथील अमृत (शाही) स्नानातही त्या सहभागी होणार आहेत. जॉब्स कुटुंबाचे भारतीय आध्यात्माशी जुने नाते आहे. याआधी स्टीव्ह जॉब्स यांनीही भारताचा दौरा केला होता. १९७० च्या दशकात जवळपास सात महिने त्यांनी भारतात वास्तव्य केल्याचे बोलले जाते.

Story img Loader