मोबाईल हा सध्या आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. याच मोबाईलमुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होत असल्याच्याही अनेक घटना घडतात. अशीच एक घटना घडली आणि यामध्ये भांडण विकोपाला गेल्याने जोडप्यातील एकाचा जीव गेला. आपल्या मोबाइलचा पासवर्ड न सांगण्याच्या हट्टापायी एकाला आपला जीव गमवावा लागला. मोबाइलचा पासवर्ड न दिल्याने एका पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडोनेशियातील वेस्ट नुसा टेंगारा या भागात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
इल्हाम चहयानी (२५ वर्ष) ही आपला पती डेडी पूरनामा (२६ वर्ष) याच्यासोबत घरात होती. त्यानंतर इल्हामने डेडीकडे मोबाइलचा पासवर्ड मागितला. पासवर्ड देण्यास नकार दिल्यामुळे इल्हाम संतप्त झाली. त्यानंतर तिने पती डेडीवर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले. घरातून आगीच्या ज्वाळा दिसत असल्यामुळे एक शेजारी घरात शिरला आणि त्याने डेडीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मग डेडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर उपचारादरम्यान गंभीर जखमी झाल्यामुळे डेडीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत तपास करणारे पोलिस म्हणाले, पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून सतत वाद होत होते. या वादात संतप्त झाल्यामुळे डेडी पूरनामाने आपल्या पत्नीला मारहाणदेखील केली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइल पासवर्डवरून वाद झाला. त्यावेळी पत्नीने पतीवर पेट्रोल ओतून त्याला जाळले.