Israel Hamas War Update in Marathi : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात नरसंहार सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील हजारो नागरिक या युद्धात मारले गेले आहेत. तसंच, युद्धाची इंत्थभूत माहिती पुरवणाऱ्या एका पत्रकाराचं संपूर्ण कुटुंबही या युद्धात मारलं गेलं आहे. गाझा पट्टीमधील अल जझिराचे मुख्य वार्ताहर वेल दहदौह यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातू या युद्धात ठार झाले आहेत.
हमास या संघटनेने इस्रायलविरोधात आक्रमण सुरू केल्यानंतर इस्रायलनेही आक्रमक पवित्रा घेतला. परिणामी इस्रायलने दक्षिण गाझापट्टी नागरिकांना सोडण्याचे आवाहन केले होते. दक्षिण गाझापट्टीत इस्रायलकडून सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. तसंच, इथं मानवतावादी सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे गाझा पट्टीतील नागरिकांना इस्रायलने स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, येथे राहून येथील परिस्थितीचं वार्तांकन करण्याच्या उद्देशाने अल जजिराचे मुख्य वार्ताहार वेल दहदौह त्यांच्या कुटुंबियांसह गाझातील निर्वासित छावण्यांमध्ये राहिले.
हेही वाचा >> रशिया, चीनचं हमासचा निषेध करणाऱ्या प्रस्तावाविरोधात मतदान, संतापलेला इस्रायल म्हणाला, “तुमच्या देशावर असा हल्ला…”
दरम्यान, इस्रायलने बुधवारी नुसिरत निर्वासित छावणीत हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात वेल यांचा सात वर्षांचा मुलगा योहिया, १५ वर्षांची मुलगी शाम, पत्नी आणि एक नातू यांचा जीव गेला आहे. धक्कादायक म्हणजे वेल दहदौह युद्धाचे वार्तांकन करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच वेल हल्ल्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आपल्या रक्ताळलेल्या मुलांना आपल्या कुशीत घेतलं. युद्धामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे हृदयद्रावक भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. हे चित्रण अल जजिरा चॅलनेवरही प्रसारित करण्यात आलं.
“काय घडले ते स्पष्ट झालेलं नाही. मुले, महिला आणि नागरिकांना या हल्ल्यात लक्ष्य केलं जातंय. मी यार्मौककडून अशा हल्ल्याबद्दल अहवाल घेत होतो तेवढ्यात इस्रायलने नुसिरतसह अनेक भागांना लक्ष्य केले, अशी माहिती वेल यांनी पत्रकारांना दिली. आपल्या कुटुंबीयांचे मृतदेह पाहण्यासाठी गेलेल्या वेल यांच्या अंगावर प्रेसचं जॅकेटही होतं. दरम्यान, दाहदौहच्या कुटुंबातील काही सदस्य या हल्ल्यातून बचावले आहेत.
हेही वाचा >> अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात २२ जणांचा जागीच मृत्यू; शाळांना सुट्टी, नागरिकांना घरांतच राहण्याचे आवाहन
अल जजिरा अरेबिकच्या मते, दहदौहचा मुलगा येहिया जखमी झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्यावर डॉक्टरांनी आपत्कालीन शस्त्रक्रियाही सुरू केली. रुग्णालयाच्या आवारात ही शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत वेलच्या काही सहकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “इस्रायलने इशारा दिल्यानंतरही वेलने गाझा पट्टी सोडली नाही. तो सलग १९ दिवस तिथंच थांबला. दररोज होत असलेल्या हल्ल्यांचं वार्तांकन करण्यासाठी मी गाझा शहरात राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणत होते.”