PAC Officer claims wife drinks his bloods in dreams: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. निमलष्करी सशस्त्र पोलीस दलातील शिपायाला शिस्तभंगाची नोटीस पाठिवण्यात आली होती. कामावर पोहोचण्यासाठी नेहमी उशीर होत असल्याबाबत शिपायाला कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. या नोटिशीला उत्तर देत असताना शिपायाने दिलेले कारण सध्या व्हायरल होत आहे. या पत्रात शिपायाने जे कारण दिले, त्यामुळे सोशल मीडियावरील युजर्सना फिरकी घेण्यासाठी नवे खाद्य मिळाले. तसेच हे पत्र वाचून वरिष्ठ अधिकारीही काहीशे हैराण झाले आहेत.
कामात बेशिस्त आणि वस्तशीरपणा नसल्यामुळे निमलष्करी सशस्त्र दलाच्या शिपायाला स्पष्टीकरण मागण्यात आले. शिपायाने सांगितले, “माझे पत्नीशी वाद सुरू आहेत. ती सध्या माझ्याबरोबर राहत नसली तरीही ती स्वप्नात येते. माझ्या छातीवर बसून माझे रक्त पिते. या कारणामुळे मी रात्री झोपू शकत नाही. तसेच कामातही माझे मन लागत नाही. या धक्क्यामुळे मला कोणत्याच बाबतीत नीट लक्ष देता येत नाही. म्हणून मला कामावर येण्यास उशीर होतो.”
उत्तर प्रदेशच्या निमलष्करी सशस्त्र दलाच्या शिपायाने दिलेले हे उत्तर वाचून वरिष्ठही हैराण झाले आहेत. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सशस्त्र दलाच्या ४४ व्या बटालियनच्या शिपायाला ही नोटीस दिली गेली होती. त्यानंतर त्याने दिलेले लेखी उत्तर सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. वारंवार स्पष्ट निर्देश देऊनही सकाळी ९ च्या ब्रीफिंगला पोहोचायला उशीर कसा होतो? असा प्रश्न वरिष्ठांनी विचारला होता. तसेच दाढी का नाही केली? चुकीचा गणवेश का घातला? असेही प्रश्न नोटिशीत विचारले गेले होते.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर एका दिवसाच्या आत कार्यालयाला लेखी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला गेला. शिपायाने कामावर येण्याचे कारण सांगताना वैयक्तिक अडचणी सांगितल्या. १६ फेब्रुवारी रोजी कामावर येण्यास उशीर झाला कारण रात्रभर झोप आली नाही. पत्नीशी सुरू असलेल्या भांडणाचा कामावर परिणाम होत असल्याचे त्याने पत्रात म्हटले.
दरम्यान ४४ बटालियनचे कमांडर सत्येंद्र पटेल यांनी सांगितले, “या पत्राची चौकशी केली जाणार आहे. पत्र लिहिणारा जवान कोण आहे? त्याच्या काय अडचणी आहेत? या पूर्ण प्रकाराची चौकशी केली जाईल. जर त्याला समुपदेशनाची गरज असेल, तर त्याला ते पुरविले जाईल. जर विभागाअंतर्गत काही मदत देता आली तर आम्ही निश्चित देऊ.”