चेन्नई :पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेवर पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. पत्नी घरामध्ये अनेक भूमिका निभावत असते आणि पतीच्या आठ तासांच्या नोकरीपेक्षा त्याला कमी लेखता येणार नाही, असे आदेश न्या. कृष्णन रामसामी यांनी अलीकडेच दिला.
एका खटल्यामध्ये पतीने पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप ठेवून, मालमत्तेवर मालकीहक्काचा दावा केला होता. खटला सुरू असतानाच फिर्यादीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलांनी खटला पुढे सुरू ठेवला होता. या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. गृहिणी पत्नी थेट आर्थिक कमाई करत नसली तरी, तिने मुलांची देखभाल, स्वयंपाक, सफाई आणि घरातील दैनंदिन व्यवस्था अशा कामांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. घरामधील तिच्या योगदानाच्या आधारावरच पतीला परदेशात जाऊन पैसे कमावणे शक्य झाले. इतकेच नाही तर कुटुंब आणि मुलांची काळजी घेताना तिने स्वत:च्या स्वप्नांचा त्याग केला आणि त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असेही न्यायालयाने नमूद केले.