Karnataka Crime : कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाची पत्नी आणि सासूने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लोकनाथ सिंह असं हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचं नाव होतं, अशी माहिती सांगितली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी लोकनाथ सिंह यांच पत्नी यशस्विनी आणि सासू हेमाबाई यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकनाथ सिंह यांचे कथित अवैध संबंध आणि व्यावसायिक व्यवहार हे या हत्यामागचं कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचं सांगितलं आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली. काही लोकांनी लोकनाथ सिंह यांचा मृतदेह चिक्कबनावरा येथील परिसरात कारमध्ये आढळून आला आणि यानंतर ही घटना उघडकीस आली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
२२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान पोलिसांना ११२ क्रमांकावर एक फोन आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना एका कारमध्ये लोकनाथ यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आणि ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
डिसेंबर २०२४ मध्ये लोकनाथ आणि यशस्विनी यांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं. मात्र, ही गोष्ट यशस्विनीच्या कुटुंबापासून लपवून ठेवण्यात आली होती. तसेच लग्नानंतरही लोकनाथने आपल्या पत्नीला तिच्या पालकांच्या घरीच ठेवलं होतं. या दोघांच्या वयातील लक्षणीय अंतरामुळे कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता, म्हणून या दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं होतं. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी यशस्विनीच्या कुटुंबाला सत्य काय ते समजलं आणि नाट्यमय घडामोडी घडल्या.
दरम्यान, लोकनाथच्या विवाहबाह्य संबंधांचे आणि संशयास्पद व्यावसायिक व्यवहारांचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. यामधून वादविवाद वाढले आणि घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोकनाथने त्याच्या पत्नी आणि सासूला धमकावण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, आरोपीने लोकनाथलाच्या जेवणातून औषध दिलं होतं. तसेच त्यानंतर यशस्विनीने त्याला चिक्काबनावरा येथील एका परिसरात नेलं, तेव्हा तिची आई पाठिमागून एका रिक्षातून आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेहून लोकनाथचा गळा कारमध्येच आवळून हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर लोकनाथच्या भावाने तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. सखोल चौकशी केल्यानंतर हत्येमागील धक्कादायक सत्य उघड झालं. शिवाय लोकनाथ स्वतः बेंगळुरूच्या केंद्रीय गुन्हे शाखेकडून फसवणुकीच्या प्रकरणात चौकशीत असल्याचेही आढळून आले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना पोलीस आयुक्तांनी माहिती देताना सांगितलं की,”यशस्विनी (वय २१) आणि तिची आई हेमाबाई (वय ३७) यांना रिअल इस्टेट व्यावसायिक लोकनाथ सिंह यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मृताचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. घटस्फोटाचीही चर्चा होती. तसेच लोकनाथ सिंहने त्याच्या सासू आणि पत्नीला धमकी दिली होती. धमकी दिल्यानंतर दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.”