High Court : महिलेला तिच्या लैंगिक स्वायत्ततेचा अधिकार आहे. तिने पॉर्न पाहणं तसंच हस्तमैथुन करणं हे काही घटस्फोटाचं कारण किंवा आधार असू शकत नाही असं मत उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तसंच पत्नीने केलेलं हे कृत्य म्हणजे काही क्रौर्य नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे न्यायालयाने?
पत्नीने एकटं असताना पॉर्न पाहणं ही काही तिच्या पतीशी केलेली क्रूरता नाही. जर पती किंवा पत्नी एकमेकांना कुणीही पॉर्न पाहण्यासाठी सक्ती करत असेल तर ती बाब क्रौर्य मानली जाईल. मात्र महिलेने एकटीने पॉर्न पाहणं किंवा ते पाहून हस्तमैथुन करणं हे क्रौर्य नाही तसंच हा काही घटस्फोटासाठीचा आधार असू शकत नाही असं मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. जर पत्नीने तिच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या नाहीत किंवा तिने पॉर्न पाहण्याचा संसारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे किंवा तिच्या वैवाहिक कर्तव्यांकडे ती दुर्लक्ष करते आहे तर कारवाईसाठी तो आधार होऊ शकतो. अन्यथा घटस्फोट घेण्यासाठी हे कारण किंवा आधार ठरु शकत नाही, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. जस्टिस जी. आर. स्वामीनाथन आणि जस्टिस पुर्णिमा मदुरै यांच्या पीठाने हे म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
न्यायालयात एका व्यक्तीने त्याची पत्नी पॉर्न पाहते आणि हस्तमैथुन करते म्हणून तिच्यापासून घटस्फोट हवा आहे अशी याचिका दाखल केली होती. या दोघांचा विवाह ११ जुलै २०१८ ला झाला. त्यानंतर ९ डिसेंबर २०२० पासून हे दोघं विभक्त राहतात. माझ्या पत्नीला गुप्तरोग आहे त्यामुळे तिच्यापासून घटस्फोट मिळावा अशी मागणी तिच्या पतीने केली होती. त्यावेळी पतीकडून पत्नी पॉर्न पाहते आणि हस्तमैथुन करते असे आरोप करण्यात आले होते. आधी हे प्रकरण कुटुंब न्यायालयात गेलं होतं. तिथे या आरोपांवरुन घटस्फोट देण्यास या न्यायालयाने नकार दिला. वैवाहिक अधिकारांची या माणसाच्या पत्नीची याचिका कुटुंब न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर पतीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. एवढंच नाही तर सदर पती त्याच्या पत्नीला कलंकित करत असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. जर पत्नीला गुप्तरोग असल्याचा पतीचा दावा आहे तर त्याने त्याचे सबळ पुरावे का दिले नाहीत? असाही सवाल न्यायालयाने केला आहे.
पतीने पत्नीवर घटस्फोट मिळावा म्हणून काय आरोप केले होते?
१) माझी पत्नी माझ्याशी क्रूरतेने वागते, सासरच्या लोकांशी तिचं वागणं चांगलं नाही. फोनवर ती दीर्घकाळ गप्पा मारते.
२) पत्नीला अनेकदा जास्त पैसे खर्च करण्याची सवय आहे. ती पैशांची बचत करत नाही.
३) पत्नीला पॉर्न पाहण्याची सवय आहे, तसंच ती आत्मसुखासाठी हस्तमैथुन करते. या तिच्या सवयी चुकीच्या आहेत.
आरोपांचे कुठलेही सबळ पुरावे नाहीत-न्यायालय
ही कारणं देऊन पतीने पत्नीपासून घटस्फोट मागितला होता. मात्र न्यायालयाने घटस्फोट नाकारला आहे. पत्नीने पॉर्न पाहणं आणि हस्तमैथुन करणं हे घटस्फोटासाठीचं कारण असू शकत नाही. तसंच तिने जास्त खर्च केला आहे, सासरच्यांचा छळ केला आहे हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही. तसंच पत्नीला गुप्तरोग आहे याचे कुठलेही सबळ पुरावे याचिकाकर्ता पती न्यायालयात सादर करु शकलेला नाही. ज्याबाबत त्याने दावे केले आहेत ते आजार सहज बरे होण्यासारखे आहेत त्यामुळे गुप्त रोगांच्या दाव्यातही तथ्य़ नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन घटस्फोट नाकारण्यात येतो आहे असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
पॉर्न फिल्मबाबत न्यायालयाने मांडलं मत
पॉर्न पाहणं किंवा तत्सम कुठलीही सवय दीर्घकाळ असणं हे योग्य नाहीच. दीर्घकाळ ही सवय असणं, त्याचं रुपांतर व्यसनात होतं. पॉर्न फिल्म या महिलांना एखादी उपभोग्य वस्तू म्हणून दाखवतात. त्यामुळे नैतिकदृष्ट्या पॉर्न पाहण्याचं समर्थन होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणात प्रतिवादी व्यक्तीचं कृत्य हे काही कायद्याच्या विरोधात नाही. त्यामुळे याचिकाकर्ता घटस्फोट मागू शकत नाही. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.