सीमा सुरक्षा दल अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कॉन्स्टेबल पूर्णब कुमार शॉ यांना पाकिस्तानच्या रेंजर्सनी ताब्यात घेतलं आहे. पंजाब येथील सीमारेषा चुकून ओलांडल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांची पत्नी पठाणकोटला रवाना झाली आहे. मला माझ्या पतीच्या सुटकेबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाही त्यामुळे मी पठाणकोटला जाते आहे असं शॉ यांच्या पत्नीने म्हटलं आहे.

शॉ यांच्या पत्नीने काय सांगितलं?

सीमा सुरक्षा दलाचे काही अधिकारी सोमवारी आमच्या घरी आले होते. मला त्यांनी काही काळजी करु नका आम्ही शॉ यांना सोडवू आणि घरी आणू असं सांगितलं. पण त्यांनी मला कुठलीही माहिती दिलेली नाही. मी गरोदर आहे, पण आता मला पठाणकोटला जावं लागतं आहे कारण पूर्णब शॉ यांच्याबाबत ते सुरक्षित आहेत याबाबत मला कुठलीही माहिती मिळालेली नाही. असं रजनी शॉ यांनी सांगितलं आहे. आठ वर्षांच्या मुलाला घरी ठेवून रजनी शॉ पतीच्या सुटकेसाठी पठाणकोटला रवाना झाल्या आहेत.

मी गरोदर आहे पण मला पठाणकोटला जावं लागतं आहे-रजनी शॉ

रजनी शॉ म्हणाल्या, “मी माझ्या पतीसाठी खूप चिंतेत आहे. मला हे ठाऊक आहे की संपूर्ण देशाला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. पण मी आता त्यांच्याशिवाय घरात राहू शकत नाही. कारण त्यांना पाकिस्तानने तुरुंगात टाकलं आहे. त्यामुळे मला आता त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांच्याबाबत माहिती हवी आहे. त्यामुळे मी पठाणकोटला जाते आहे.” असं रजनी शॉ यांनी म्हटलं आहे.

रजनी म्हणाल्या, माझ्या बरोबर माझे सासू सासरे म्हणजेच पूर्णब यांचे आई वडीलही येणार आहे. पण त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे ते घरीच राहणार आहेत. मी पठाणकोटला जाऊन माझ्या पतीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कदाचित मला तिथेही सगळी माहिती मिळणार नाही. पण मला असं वाटायला नको की मी प्रयत्नच केला नाही असंही रजनी यांनी सांगितलं.

२३ एप्रिलच्या दिवशी काय घडलं?

२२ एप्रिलच्या दिवशी काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटक निष्कारण मारले गेले. या घटनेनंतर एक दिवसाने म्हणजेच २३ एप्रिलच्या दिवशी सीमा सुरक्षा दलाचे २४ बटालियनचे कॉन्स्टेबल पूर्णब शॉ यांनी चुकून देशाची सीमा रेषा ओलांडली त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या रेंजर्सनी ताब्यात घेतलं आहे. पूर्णब शॉ काही शेतकऱ्यांचं रक्षण करत होते त्यावेळी त्यांनी चुकून सीमारेषा ओलांडली ते गणवेशात होते आणि त्यांच्याकडे त्यांची रायफलही होती. आता त्यांच्या पत्नीने पठाणकोटला जाण्याचा निर्णय घेतला आहे.