Delhi lady Don Arrested : दिल्लीतील कुख्यात गँगस्टर हाशिम बाबा याची पत्नी आणि लेडी डॉन झोया खान हिला अखेर पोलि‍सांनी अटक केली आहे. अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात असूनही कायद्याच्या कचाट्यात न सापडलेल्या दिल्लीच्या या ‘लेडी डॉन’ला २७० ग्रॅम हेरॉइन बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे १ कोटी रुपये इतकी किंमत आहे.

झोया (३३) ही अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणांच्या रडारावर होती पण ती नेहमी चार पावले पुढे राहण्यात यशस्वी ठरली. तिने तिच्या तुरूंगात गेलेल्या पतीचं गुन्हेगारी साम्राज्य सांभाळलं. इतकेच नाही तर ती त्याची टोळी देखील चालवत होती. हे सर्व करत असताना पोलिसांना गुन्हेगारी कारवायांशी आपला थेट संबंध जोडता येणार नाही याची व्यवस्थित काळजी तिने घेतली होती. तिच्या गुन्हेगारी क्षेत्रातील सहभागाबद्दल संशय असूनही, आतापर्यंत पोलि‍सांना कधीही तिच्या विरोधात ठोस कारवाई करत खटला उभा करता आला नव्हता.

गँगस्टर हाशिम बाबा याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये हत्या, खंडणी शस्त्रास्त्र तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. झोया खान ही त्याची तिसरी पत्नी आहे. हाशिम बाबा याच्याशी २०१७ साली लग्न करण्याच्या आधी झोयाचे दुसर्‍या एका व्यक्तीशी लग्न झाले होते. घटस्फोट घेतल्यानंतर ती बाबा याच्या संपर्कात आली. ते पूर्वी दिल्लीत एकमेकांच्या शेजारी राहायचे यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले.

गुन्हेगारी साम्राज्य

हाशिब बाबा हा तुरुंगात गेल्यानंतर झोयाने गँगची जबाबदारी सांभाळली. सुत्रांच्या माहितीनुसार. झोयाचा तिच्या पतीच्या गँगमधील भूमिका ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर प्रमाणे होती, जी एकेकाळी दाऊदच्या गँगचे सर्व बेकायदेशीर व्यवहार सांभाळत होती. दिल्ली पोलिस स्पेशल सेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार झोया हिचा खंडणी आणि ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत मोठा सहभाग राहिला आहे.

झोयाने इतर गँगमधील बॉसपेक्षा स्वतःची वेगळी प्रतिमा तयार केली होती. ती हाय प्रोफाईल पार्ट्यांना जात असे आणि स्वतः अत्यंत महागडे आणि ब्रँडेड कपडे वापरत असे, ज्यामध्ये अनेक लक्झरी ब्रँड्सचा समावेश होता. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

झोया तिहार तुरूंगात तिच्या पतीला वारंवार भेटायला जात असे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, बाबाने तिला सांकेतिक भाषेत गँग चालवण्याचे प्रशिक्षण दिले. गँगचे आर्थिक व्यवहार कसे सांभाळायचे, कामे कशी करायची याबद्दल तो तिला सल्ला देत असे. झोया ही तुरुंगाबाहेरील त्याच्या सहकाऱ्यांशी तसेच इतर गुन्हेगारांशी थेट संपर्कात होती.

अखेर रंगेहाथ सापडली

अनेक वर्ष दिल्लीच्या काईम ब्रँचचे विशेष पथक तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र यावेळी विशेष पथकाला यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी झोयाला ईशान्य दिल्लीतील वेलकम परिसरात अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून पुढे पाठवण्यासाठी आणलेल्या हेरॉइनसह तिला रंगेहाथ पकडण्यात आले.

झोयाचे कुटुंब यापूर्वीपासून गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधीत राहिले आहे. तिच्या आईला २०२४ मध्ये मानवी तस्करी प्रकरणात तुरूंगात टाकण्यात आले होते. ती सध्या जामीनावर बाहेर आहे. तिचे वडील ड्रग्ज विक्रीशी संबंध आहेत. झोया स्वतः ईशान्य दिल्लीतील वेगवेगळ्या भागातून काम करते आणि ती नेहमी ४-५ सशस्त्र गुंड तिच्या भोवती असतात.

Story img Loader