गेल्या अनेक दिवसांपासून नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. आता गुजरात कॅडरच्या आयएएस अधिकाऱ्याबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कथित गँगस्टर प्रियकराबरोबर पळून गेलेल्या IAS ऑफिसरच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रंजित कुमार हे गुजरात इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कमिशनचे सचिव आहेत. त्यांची विभक्त पत्नी शनिवारी गुजरातमधील गांधीनगर येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली. निवासस्थानाच्या पलीकडील बागेत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वृत्तानुसार, रंजीत कुमार यांनी घरातील कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, त्यांच्या पत्नीला घरात घेऊ नका. पत्नीवर एका मुलाच्या अपहरणाचा आरोप आहे.
हेही वाचा >> अशी ही बनवाबनवी! विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसाठी लिहिले पत्र
मदुराई येथील १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी महिला पतीच्या घरी गेली असावी, असा कयास लावला जात आहे. आत्महत्येआधी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी तामिळमध्ये एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील दोन प्रकरणांमध्ये त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून याबाबत त्यांना वेदना होत असल्याचं म्हटलं आहे.
राजा नावाच्या व्यक्तीने जाळ्यात अडकवलं
पत्रात संबंधित महिलेने दावा केला आहे की ‘राजा’ नावाच्या व्यक्तीने तिला जाळ्यात अडकवले होते. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध आला. तसंच, त्यांच्यावर दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. महिलेकडून कर्ज वसुली केल्याप्रकरणी आणि मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा >> मुंबईत चाललंय तरी काय? महिलेला पाहून तरुणाने काढली पँट अन्…; जुहूमधील संतापजनक VIDEO व्हायरल
मृतदेह ताब्यात घेण्यास आयएएस अधिकाऱ्याचा नकार
पतीच्या घरी गेली तेव्हा तिने विष बरोबर नेले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांचा मृतदेह गांधीनगर येथील शवागरात ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचा मृतदेह घेऊन जाण्याची वाट पाहत आहेत, कारण त्यांच्या पतीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
रंजीत कुमारचे वकील हितेश गुप्ता यांनी सांगितले की, हे जोडपे २०२३ मध्ये वेगळे झाले होते आणि घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत होते. रणजीत कुमार शनिवारी पत्नीबरोबर घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम निर्णय घेण्यासाठी बाहेर गेले होते. घरात प्रवेश न दिल्याने नाराज होऊन त्यांनी विष प्राशन केले आणि १०८ (एम्ब्युलन्स हेल्पलाइन नंबर) वर कॉल केला”, असे पोलिसांनी सांगितले.